आमदारांच्या तक्रारींबाबत ६ एप्रिलला बैठक

शिवसेनेच्या आमदारांमध्ये मंत्र्यांविरोधात असंतोष वाढत असून  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काही मंत्र्यांना डच्चू देण्याचा विचार करीत असल्याचे समजते. आमदारांच्या तक्रारींबाबत ठाकरे यांनी सहा एप्रिलला बैठक बोलाविली आहे.

शिवसेनेचे मंत्री नीट वागणूक देत नाहीत, बोलत नाहीत, कामे करीत नाहीत, शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात निधी उपलब्ध होत नाही, अशा विविध तक्रारी शिवसेनेच्या आमदारांनी अनेकदा केल्या आहेत. आमदारांमध्ये धुमसत असलेला असंतोष कमी करण्यासाठी ठाकरे यांनी आमदार व मंत्र्यांबरोबर एकत्रित व स्वतंत्र बैठका घेतल्या. मंत्र्यांना कानपिचक्याही दिल्या. पण मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे मंत्री आक्रमक भूमिका घेत नाहीत, अनेकदा बोलतही नाहीत. आमदारांचे प्रश्न सरकारकडून सोडविण्यासाठी सहकार्य करीत नाहीत, अशा तक्रारी आमदारांनी केल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिवसेनेच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्याचा निर्णयही पक्षप्रमुखांकडून घेतला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.