आपल्या टॉवरमधील सदनिका मांसाहारींना खरेदी करण्यास नकार देणाऱ्या बिल्डरांना चाप लावण्याची तयारी मनसेने सुरू केली असून पालिका सभागृहात मनसेला साथ देण्याचे संकेत शिवसेनेकडून मिळाले आहे. भाजप नगरसेवक याविरोधात भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पालिका सभागृहाच्या बैठकीत शिवसेना, मनसे विरुद्ध भाजप असे रण पेटण्याची चिन्हे आहेत.
मुंबईमध्ये काही इमारतींमधील सदनिका खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना ते केवळ मांसाहारी असल्याने बिल्डरांकडून नकार देण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी एक ठरावाची सूचना पालिका सभागृहाच्या मंगळवारच्या बैठकीत मांडण्याचा निर्णय घेतला आहे. टॉवरमधील एखादी सदनिका खरेदी करण्यास मांसाहारींना मज्जाव करणाऱ्या बिल्डरला दिलेली आयओडी आणि सीसी पालिकेने तात्काळ रद्द करावी, अशी मागणी ते ठरावाच्या सूचनेद्वारे करणार आहेत.
मांसाहारींच्या विरोधात मोहीम उघडणाऱ्या बिल्डरांना चाप लावण्यासाठी मनसेचे नगरसेवक पालिका सभागृहात हल्ला बोल करणार आहेत. या मुद्दय़ासाठी शिवसेनेचीही साथ मिळावी यासाठी मनसेकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश आले असून ही ठरावाची सूचना एकमताने मंजूर करण्याचा मानस शिवसेना नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र भाजप याविरोधात भूमिका घेण्याची चिन्हे आहेत.
त्यामुळे पालिका सभागृहात शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांबरोबर भाजपची खडाजंगी होण्याची शक्यता आहे.शिवसेना आणि मनसे आपल्या संख्याबळाच्या जोरावर ही ठरावाची सूचना मंजूर होऊन भाजपला शह बसेल अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.