शिवाजी पार्क परिसरात वायफाय सुविधा सुरू करण्यावरुन शिवसेना आणि मनसेने परस्परांना शह-काटशह दिला आहे. मनसेने शिवाजी पार्कमध्ये मंगळवारी वायफाय सुविधेची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याचवेळी शिवसेनेच्या विभागप्रमुखांच्या पुत्रानेही आपल्या घरातील वायफाय सुविधा नागरिकांसाठी खुली करून दिली. ही सुविधा आपण प्रथम सुरू करून दिली अशी टिमकी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते वाजवित आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण मुंबईत पायफाय सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. शिवाजी पार्क परिसरात प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू करून नंतर इतरत्र ती देण्यात येणार आहे. तत्पूर्वीच मनसेने शिवाजी पार्कमध्ये वायफाय सेवा उपलब्ध करण्याची तयारी सुरू केली. मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी परवानगी मिळविल्यानंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये वायफाय सेवा सुरू करण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी या सुविधेचे उद्घाटन केले.मनसेला शह देण्यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख सदा  सरवणकर यांचे पुत्र समाधान यांनी आपल्या घरची वायफाय सेवा नागरिकांसाठी खुली केली.