कल्याण डोंबिवली पालिकेत मागील साडे तीन वर्षांपासून विरोधी पक्षनेते पद भूषविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पद शिवसेना, काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी संगनमत करून काढून घेतल्याने खळबळ उडाली आहे.
पालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्या नावाची घोषणा केली. संतप्त झालेल्या मनसेच्या नेत्यांनी या निवडीला तीव्र आक्षेप घेऊन, विरोधी पक्ष नेते पदाचे दालन काँग्रेसला देण्यास विरोध करून या दालनाला टाळे ठोकले.
लोकसभा निवडणुकीत पडद्यामागून शिवसेना आणि काँग्रेसचा झालेला ‘घरोबा’. या घरोब्यातून शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना मिळालेले यश. काँग्रेसने दिलेल्या या पडद्यामागील ‘हाता’ला उतराई होण्यासाठी शिवसेनेने पालिकेत काँग्रेसशी गट्टी करून मनसेला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. कल्याण लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात झालेली झुंज. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या मतदारसंघात शिवसेना उमेदवाराला मिळालेल्या विजयानंतर मनसेला धोबीपछाड देण्याचा चंग शिवसेना नेत्यांनी बांधला असल्याचे बोलले जात आहे. त्याचा पहिला फटका शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदी काँग्रेस नगरसेवकाला बसवून देण्यात आला आहे.
मागील दोन वर्षांपासून पालिकेत विरोधी पक्षनेते पद मनसेचे मंदार हळबे भूषवत आहेत. त्यांची कारकिर्द यथातथातच राहिल्याने मनसे मधून त्यांच्या कार्य पध्दती विषयी तीव्र नाराजी होती. मुंबईतील ‘सरदेसाईशाही’ हळबे यांच्या पाठिशी असल्याने
त्यांच्या विषयी पक्षातील एकही नेता, पदाधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नव्हता. शुक्रवारच्या अर्थसंकल्पीय महासभेत महापौर कल्याणी पाटील यांनी पालिकेतील विरोधी पक्षनेते पदी विश्वनाथ राणे यांची निवड करावी म्हणून काँग्रेसच्या प्रदेशध्यक्षांनी पत्र पाठवले आहे. या निवडीबाबत कायदेशीर सल्ला घेऊन काँग्रेसच्या विश्वनाथ राणे यांची निवड केली जाईल असे जाहिर करून मनसेला सूचक इशारा दिला होता.
शनिवारच्या तहकूब महासभेत सभा संपताना महापौरांनी विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसच्या राणे यांची निवड जाहीर करून मनसेची खुर्ची काढून घेतली. त्यानंतर मनसेच्या नगरसेवकांनी गदारोळ केला. या घटनेचा निषेध करत मनसेच्या नगरसेवकांनी सभात्याग करून मुंबईतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला प्रयाण केले. साडे तीन वर्षांनंतर काँग्रेसला पालिकेतील विरोधी पक्षनेते पद आपणास मिळू शकते याचा साक्षात्कार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना अचानक झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.