ठाणे शहरातील बेकायदा तसेच धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी एकत्रित विकास योजनेस (क्लस्टर) मंजुरी द्यावी या मागणीसाठी गुरुवारी शिवसेनेतर्फे ठाणे ते आझाद मैदान दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या लाँग मार्चला गुरुवारी उशिरापर्यंत मुंबई तसेच ठाणे पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा नेणारच, अशी ताठर भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली असून पूर्व द्रुतगती महामार्गावरून काढण्यात येणाऱ्या या मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाण्यातून मुंबईच्या दिशेने शिवसैनिकांना घेऊन जाण्यासाठी सुमारे ८०० ट्रक तसेच टेम्पोची व्यवस्था करण्यात आली असून यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळी ११ वाजता ठाण्यातील तीन हात नाका येथून हा मोर्चा निघणार असून आनंदनगर चेकनाका येथे त्याचे रूपांतर सभेत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.