पीकविमा कंपन्या या शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याने याविरोधात शिवसेनेने मुंबईतील वीमा कंपन्यांच्या कार्यालयांबाहेर मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत. एशिअन हार्ट इन्स्टिट्यूटपासून या मोर्चाला सुरुवात झाली असून बीकेसी परिसरातील भारती अॅक्सा या वीमा कंपनीसमोर या मोर्चाची सांगता होणार आहे. शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी झाले आहेत.

शिवसेनेचा हा मोर्चा शेतकऱ्यांचा मोर्चा नसून शेतकऱ्यांसाठी असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना देताना वीमा कंपन्यांकडून त्यांना त्रास दिला जातो. याचे नियम शेतकऱ्यांना विचारुन तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची यामध्ये पिळवणूक होते. हे सर्व बदलले जावे यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जर या मोर्चाचा अर्थ पीकविमा कंपन्यांना कळत नसेल तर त्यांना यानंतर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशाराही शिवसेनेकडून या वीमा कंपन्यांना देण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यातही शिवसेनेच्यावतीने अशा प्रकारे मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून येरवडा येथील बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीच्यासमोर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये खासदार ओम राजेनिंबाळकर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेनेचे पुणे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह आजी माजी पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.

पीकविम्याबाबत शिवसेनेनेचे म्हणणे आहे की, सन २०१६मधील खरीप हंगामावेळी प्रधानमंत्री पीकविमा योजनेला सुरुवात झाली. २०१६-१७मध्ये महाराष्ट्रातील १ कोटी २० लाख तसेच २०१७-१८मध्ये १ कोटी १ लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नोंदणी केली होती. २०१७ खरीप हंगामापेक्षा कमी शेतकऱ्यांना २०१८च्या खरीप हंगामामध्ये पीकविमा योजनेचा लाभ मिळाला. २०१७च्या खरीप हंगामात पीकविम्याच्या २८६० कोटी रुपयांच्या देयकांवरुन २०१८च्या खरीप हंगामात ३३९० कोटी रुपयांची वाढ झाली. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २०१७च्या खरीप हंगामात ४९.८ लाख आणि २०१८च्या खरीप हंगामात ४५ लाख शेतकऱ्यांचे दावे स्विकारले गेले. पीकविमा वितरणातील विलंबाची समस्या राज्यात चालूच राहिली. त्यामुळे ४ जूनपर्यंत फक्त ३५.२२ लाख शेतकऱ्यांना दाव्याची भरपाई मिळाली होती. औरंगाबादमध्ये तांत्रिक अडचणींमुळे १७,००० शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेच विमा कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने या धडक मोर्चाचे राज्यभरात आयोजन केले आहे.