नियम डावलून कोट्यवधी रुपयांच्या सरकारी खरेदीला मंजुरी दिल्यामुळे राज्यातील भाजपचे दोन मंत्री वादाच्या भोवऱयात सापडले असताना, या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंगळवारी व्यक्त केले. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी चौकशीला सामोरे जाऊन निर्दोषत्व सिद्ध होत नाही, तोपर्यंत मंत्रिपद घेऊ नये, असे सावंत यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणांमध्ये काय भूमिका घेतात, याकडे शिवसेनेचे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावंत म्हणाले, बाळासाहेबांच्या काळात असे आरोप झाले असते, तर त्यांनी पुरावे मागितले असते. जर पुराव्यांमध्ये त्यांना प्रथमदर्शनी काही तथ्य आढळले असते, तर त्यांनी संबंधित मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगितले असते. चौकशीला सामोरे जाऊन निर्दोषत्व सिद्ध करावे आणि पुन्हा मंत्रिपद स्वीकारावे, असेच त्यांनी सांगितले असते, असे सावंत यांनी सांगितले. पंकजा मुंडे आणि विनोद तावडे प्रकरणात हेच सूत्र वापरले गेले पाहिजे. चौकशीला सामोरे जायला काय हरकत आहे, असे ते म्हणाले.
पंकजा मुंडे यांनी नियम डावलून २०६ कोटी रुपयांची कंत्राटे दिल्यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यातच आता तावडे हे सुद्धा नियम डावलून दरकरार पद्धतीने खरेदीला मान्यता दिल्यावरून वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. १९१ कोटी रुपयांच्या खरेदीचे कंत्राट दरकरार पद्धतीने दिले गेल्याने तावडे अडचणीत आले आहेत.