अभियांत्रिकी महाविद्यालयांवर कारवाईसाठी सेना खासदाराचे मुख्यमंत्र्यांना साकडे

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पुरेसे शिक्षक आहेत का, त्यांना वेळेवर वेतन मिळते का, नियमानुसार पायाभूत सुविधा आहेत का, शिक्षणाचा दर्जा राखला जातो का, महाविद्यालयांकडे इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आहे का, तसेच एआयसीटीईच्या निकषांचे काटेकोरपणे पालन होते का, याची नव्याने चौकशी करावी, अशी विनंती शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सोयी-सुविधांबाबत खोटी माहिती देणाऱ्या महाविद्यालयांचे शुल्क ५० टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणीही खासदार जाधव यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा कमालीचा घसरला असून, अनेक महाविद्यालयांत पुरेसे अध्यापक नाहीत. अध्यापकांना वेळेवर पगार मिळत नाही. पायाभूत सुविधांची बोंब असून, त्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. खोटी माहिती सादर करणाऱ्या महाविद्यालयांचे शुल्क ‘शिक्षण शुल्क समिती’च्या नियमानुसार ५० टक्क्यांनी कमी करावे, अशी मागणी त्यांनी केली.राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने तसेच एआयसीटीईने यापूर्वी केलेल्या चौकशीत शिक्षणाच्या सुविधांची परिस्थिती गंभीर असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, अशा महाविद्यालयांवर ठोस कारवाई करण्यास संचालनालय तसेच संबंधित विद्यापीठे तयार नाहीत, ही दुर्दैवी गोष्ट आहे. या साऱ्यांनी झोपेचे सोंग घेतलेले असल्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. तंत्रशिक्षण मंत्रालय हा भ्रष्ट व्यवस्थेचा अड्डा बनला असून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांचेही याप्रकरणी लक्ष वेधण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला. तथापि त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे आता आपणच या विषयात लक्ष घाला, अशी विनंती खासदार जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

प्राचार्यावरही कारवाईची मागणी

बहुतेक महाविद्यालयांचे प्राचार्य आपल्या महाविद्यालयात सर्व सोयी-सुविधा असल्याची खोटी प्रतिज्ञापत्रे वर्षांनुवर्षे ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ला देतात. अशा प्राचार्यावरही फौजदारी गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. शासनानेच नेमलेल्या डॉ. गणपती यादव समितीच्या अहवालानुसार अभियांत्रिकी शिक्षणात आवश्यक त्या सुधारणा झाल्यास शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मोठी मदत होईल, असेही जाधव यांनी पत्रात म्हटले आहे.