उद्धव ठाकरेंच्या प्रचाराविनाही ताकद वाढली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे निवडणूक प्रचारात न उतरता मंत्री व अन्य नेत्यांवर जबाबदारी सोपवूनही शिवसेनेने याआधीच्या निवडणुकीपेक्षा अधिक यश संपादन केले आहे. प्रत्येक गावामध्ये असलेले शिवसेनेचे जाळे, संपर्कप्रमुख व पक्षाच्या अन्य नेत्यांची फळी यावर विसंबून राहून शिवसेनेने या निवडणुका लढविल्या. भाजपच्या तुलनेत शिवसेनेला कमी यश मिळाले व सावंतवाडीत झटका बसला असला तरी ताकद काही प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुका बहुतांश स्वबळावर लढूनही शिवसेनेला कोकण व मराठवाडय़ात काही प्रमाणात यश मिळाले. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकांत दाणादाण उडूनही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकांमध्ये काही प्रमाणात यश मिळाल्याने त्याबाबत शिवसेना व भाजपला चिंतन करावे लागेल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात न उतरण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांचे निकाल हे सरकारच्या कामगिरीची प्रचीती देणारे ठरतील असे मानून स्वत: रणनीती व प्रचाराची धुरा सांभाळली, तर ठाकरे यांनी स्वत: प्रचारात न उतरता शिवसेनेचे मंत्री व नेत्यांवरच भिस्त ठेवली. याआधीही स्थानिक आघाडय़ांमार्फत शिवसेना निवडणुका लढत असल्याने हा निर्णय झाल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

शिवसेना गावागावांत पोहोचली आहे व शिवसेनेच्या शाखा आहेत. संपर्क यंत्रणा प्रभावी असल्याने स्थानिक नेत्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविली, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.  लोकसभा व विधानसभा निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची धूळधाण झाली होती. मात्र, त्यांना या निवडणुकीत काही ठिकाणी यश मिळाले आहे. त्यामागे कोणती कारणे आहेत, याचा शिवसेना व भाजप दोघांनाही गांभीर्याने विचार करावा लागणार असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले. मात्र या नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व खूपच कमी होते. त्या तुलनेत आता ते वाढल्याने निकालांवर शिवसेनेमध्ये समाधानाची भावना आहे.

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणात मंत्र्यांवर आणि पक्षाच्या संपर्कनेत्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविली होती. अन्य पक्षातील नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचे निर्णय ठाकरे यांच्या पातळीवर झाले. त्यांनी स्थानिक राजकारण पाहून व्यूहरचना केली. मात्र, स्थानिक आघाडय़ांमध्ये फारसे न उतरता शिवसेनेने स्वबळावर लढण्यावर जोर दिला.