भाजपने टाकलेल्या सापळ्यात आपले आमदार अडकू नये म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सावध झाले आहेत. आमदारांवर बारीक लक्ष ठेवण्यात आले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेतली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे होते. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सोमवापर्यंत लांबणीवर पडल्यावर आमदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या. राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या आमदारांना पवईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांची राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. आमदारांशी चर्चा केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार सत्तेत येईल, अशी ग्वाही दिली. दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेतली. या वेळी पवार आणि ठाकरे यांनी संयुक्तपणे आमदारांशी संवाद साधला.

काँग्रेसच्या आमदारांचा मुक्काम विमानतळाजवळील एका पंचतारांकित हॉटेलात असून, अहमद पटेल हे सध्या मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. काँग्रेस नेत्यांनी आमदारांना सरकार स्थापन होईल, असा दिलासा दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी काँग्रेस आमदारांची भेट घेतली.

भाजपकडून काँग्रेस आमदारांना फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. घोडेबाजार करून सरकार टिकविण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा दावाही चव्हाण यांनी केला. काँग्रेसच्या आमदारांशी भाजपकडून अजूनही संपर्क साधण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलच्या आवारात साध्या वेशातील पोलीस आढळल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

शिवसेनेच्या आमदार असलेल्या पंचतारांकित हॉटेलात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत आपलेच सरकार येणार, अशी ग्वाही आमदारांना दिली. सर्वानी बरोबर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरक्षितस्थळी ठेवलेल्या ठिकाणी सारे आमदार असले तरी कोण विरोधात भूमिका घेऊ शकतो, याची चाचपणी नेतृत्वाकडून केला जात होता. काही आमदार फुटू शकतात याची तिन्ही पक्षांच्या नेत्यांना भीती आहे. राष्ट्रवादीत अधिकच गोंधळाचे आणि संशयाचे वातावरण आहे. अजित पवार यांच्याबरोबर गेलेले काही आमदार परतले असले तरी त्यांच्याबद्दल संशय कायम आहे.