राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोंडी होत असल्यानेच माजी मंत्री भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला व त्यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण मंत्रिमंडळ विस्तारात संधी नाकारण्यात आल्याने शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच बरा होता, अशी भावना त्यांची झाली आहे.

कोकणातील आक्रमक नेत्यांमध्ये भास्कर जाधव यांची गणना होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी दोन हात करण्याचे धाडस त्यांनी मागे केले होते. १९९९ मध्ये शिवसेनेच्या वतीने निवडून आलेल्या जाधव यांना २००४च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. परिणामी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देत कालांतराने राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री, प्रदेशाध्यक्षपद अशी महत्त्वाची पदे त्यांना मिळाली. कोकणातील राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याशी त्यांचे बिनसले. उभयतांमधील वाद वाढत गेला. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने या वादाकडे कानाडोळा केला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत तटकरे यांच्याकडून दगाफटका होण्याची भीती जाधव यांना होती. सुमारे १५ वर्षांनी त्यांनी शिवसेनेत फेरप्रवेश केला तेव्हा त्यांना सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मंत्रिमंडळ विस्तारात कोकणातील उदय सामंत यांना मंत्रिपद देण्यात आले. यामुळे जाधव यांना भ्रमनिरास झाला. राष्ट्रवादी सोडला नसता तर मंत्रिपद तरी मिळाले असते. शिवसेनेत फसगत झाल्याची जाधव यांची भावना झाली. २००४च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी नाकारण्यात आली. २०१९ मध्ये पक्षात घेऊन मंत्रिपद नाकारण्यात आले. यामुळे शिवसेनेत प्रवेश करून काय साधले, असा प्रश्न जाधव यांना भेडसावू लागला आहे.

कोणाला मंत्री करायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावर आपला विचार व्हायला पाहिजे होता ही आपली ठाम भावना आहे. अर्थात पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. – भास्कर जाधव, माजी मंत्री