आगामी निवडणुकांबाबत शरद पवार यांचे सूतोवाच; राज्य सरकारवर स्तुतिसुमने

मुंबई : राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार उत्तम काम करीत आहे. हे सरकार पाच वर्षे टिके ल आणि पुढील काळातही तिन्ही पक्ष एकत्रितपणे जोमाने काम करतील, असा विश्वाास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम राहील, असे सूतोवाच गुरुवारी के ले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांनी समाजमाध्यमाद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘‘मराठा आरक्षण असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राखीव जागांचा प्रश्न असेल, ते आपल्याला सोडवावेच लागतील. सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर ती भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट होऊ द्यायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे, तरच समाजातील प्रत्येक घटकाला आपण सत्तेतील वाटेकरी आहोत, असे वाटेल. त्यामुळे आपल्याला अधिक लोकांचा पाठिंबा मिळेल’’, असे पवार म्हणाले.

‘‘महाराष्ट्रात आपण एक वेगळ्या विचाराचे सरकार स्थापन केले. कधी कुणाला वाटले नसेल की, शिवसेना व आपण एकत्र येऊन काम करू. पण पर्याय दिला. तो पर्याय लोकांनी स्वीकारला आहे. तिन्ही पक्षांच्या लोकांनी बांधिलकी ठेवून योग्यरीतीने पावले टाकायला सुरुवात केली. त्यामुळे आघाडी सरकार उत्तमरीत्या काम करत आहे’’, असे पवार म्हणाले.

दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वतंत्र भेटीचा संदर्भ देत पवार म्हणाले की, हे सरकार किती दिवस, किती आठवडे, किती महिने चालेल, याबाबत सुरुवातीला माध्यमांमध्ये चर्चा रंगली होती. पण, आता कोणी चर्चा करत नाही. काल-परवा थोडीफार चर्चा झाली. राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांची स्वतंत्र भेट झाली व त्यात काही चर्चा झाली. त्यावर महाराष्ट्रात लगेचच वेगवेगळ्या प्रकारच्या शंका व वावड्या

उठवायला सुरुवात झाली. त्यावर यत्किंचितही विचार करण्याची आवश्यकता नाही. हे सरकार पाच वर्षे टिके ल, काम करेल, नुसतेच पाच वर्षे नाही तर आगामी लोकसभेला व विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करेल. देशातील व राज्यातील सामान्य जनतेसाठी प्रभावीपणे काम करेल.’’

अजित पवारांची मोदी सरकारवर टीका

भाजपची सत्ता आल्यापासून देशाची एकता, अखंडतेस धक्का देण्याचे काम सुरू आहे. लोकशाही टिकवून ठेवणाऱ्या संस्था मोडीत निघाल्या. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची अवस्था गंभीर आहे. त्यांना स्वातंत्र्य किती आहे, त्यांच्यावर कशाप्रकारे दबाव टाकला जातो, लोकशाही संकटात आल्यासारखे वाटते आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका के ली. या वेळी प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार प्रफु ल्ल पटेल, आरोग्यमंत्री राजेश टोपे आदींची भाषणे झाली.

शिवसेना हा दिलेला शब्द पाळणारा पक्ष’

महाराष्ट्र शिवसेनेला अनेक वर्षे पाहतोय. देशात जनता पक्षाचे सरकार असताना त्यावेळी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा सगळीकडे पराभव झाला होता. अशा स्थितीत कॉंग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पुढे आली. त्या पक्षाने इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही, असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. बाळासाहेबांनी दिलेला शब्द पाळला हा इतिहास विसरता येणार नाही. दिलेला शब्द पाळणारा पक्ष म्हणजे शिवसेना, असे कौतुकोद्गार पवार यांनी यावेळी काढले.