शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रातील अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेचे आसूड ओढण्यात आले होते. पक्षाच्या अध्यक्षांवर केलेली टीका सहन न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रभादेवी येथील सामनाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याला रोखण्यासाठी सरसावलेले शिवसैनिक आणि राष्ट्वादीचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याने परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. तणावाची ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सामनाच्या कार्यालयाबाहेर सध्या त्वरित शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणात शरद पवार यांनी पुण्यातील फेसबुकप्रकरणावरून केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली होती. त्यानंतर, सामना वृत्तपत्रातील आजच्या (बुधवार) अग्रलेखात शरद पवार हे पाकिस्तानी अतिरेकी हाफिज सईदसारखी गरळ ओकत असल्याची टीका करण्यात आली होती.