|| सौरभ कुलश्रेष्ठ

शिवसेनेशी राम मंदिराच्या मुद्दय़ावर श्रेयवादाची लढाई

हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा हाती घेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘२५ नोव्हेंबरला चलो अयोध्या’ अशी हाक दिल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही २५ नोव्हेंबरला राम मंदिराच्या मागणीसाठी सभा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्दय़ावर आतापासूनच श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. यात शिवसेना वरचढ ठरू नये यासाठीच संघाने तोच मुहूर्त गाठल्याचे मानले जात आहे.

हिंदुत्व व राम मंदिराच्या मागणीसाठीचे आंदोलन उभे करण्याचे सूतोवाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपापल्या संघटनेच्या दसरा मेळाव्यात म्हणजे एकाच दिवशी केले. मात्र, त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी ‘चलो अयोध्या’ अशी हाक दिली होती. २५ नोव्हेंबर हा दिवस केवळ ठाकरे यांनी मेळाव्यात जाहीर केला. त्यानंतर राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्दा सातत्याने मांडत आगामी लोकसभा निवडणुकीत तोच प्रचारात मुख्य मुद्दा राहील, याचे संकेत दिले.

एकीकडे शिवसेना व संघ राम मंदिराच्या मुद्दय़ावर परस्पर पूरक भूमिका घेत आहेत. त्याचवेळी शिवसेनेला एकटय़ाला श्रेय मिळू नये, हिुंदत्ववादी आणि रामभक्तांच्या नजरेत आपणही ठसले पाहिजे, अशी काळजी संघ व भाजप घेत असल्याचे दिसून येत आहे.

प्रसिद्धीत वाटेकरी!

उद्धव ठाकरे यांच्या या अयोध्या वारीमुळे राम मंदिराच्या आंदोलनात शिवसेना वरचढ ठरू शकते. प्रसिद्धीचा सर्व झोत त्यांच्यावर जाईल हे लक्षात आल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही २५ नोव्हेंबरला राम मंदिरासाठी सभा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे स्वाभाविकच २५ नोव्हेंबरला राम मंदिराच्या मुद्दय़ावर उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या श्रेय-प्रसिद्धीच्या लढाईत संघही वाटेकरी ठरणार आहे.