प्रकल्पाच्या विरोधातील संभ्रम उघड; उद्योगमंत्री पुन्हा मवाळ

मुंबई : ‘नाणार प्रकल्पास कोणाचाही विरोध नाही’ असे विधानसभेत लेखी उत्तराद्वारे सांगणारे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना गेल्या तीनचार महिन्यांत प्रचंड कसरती कराव्या लागल्याने, विरोधाच्या मुद्दय़ावरून शिवसेना संभ्रमातच असल्याचे दिसत आहे. हा प्रकल्प लादला तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जनतेसोबत राहीन अशी आक्रमक घोषणा करणाऱ्या देसाई यांनी मंगळवारी पुन्हा मवाळ रूप धारण करून, ‘भूसंपादनाची अधिसूचना मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. आता मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील अशी आशा आहे’, असे सांगून एक पाऊल मागे घेतल्याचे संकेतही दिले.

नाणार प्रकल्पासंदर्भात गेल्या चार महिन्यांत सुभाष देसाई यांची भूमिका वेळोवेळी बदलल्याने कोकणातील काही राजकीय नेत्यांनी देसाई यांच्यावर कठोर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव व नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी तर ‘कोकणचा कसाई, सुभाष देसाई’ अशी घोषणा देत कोकणातील वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. नाणार प्रकल्पास कोणाचाही विरोध नाही असे उत्तर देणाऱ्या देसाई यांनी लगेचच विधानसभेत आपली भूमिका बदलली. या प्रकल्पाबाबत जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन निर्णय करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे देसाई यांनी निवेदनाद्वारे सांगितले. मात्र, त्यांच्या निवेदनात हा प्रकल्प रद्द करण्याबाबत कोणताही उल्लेख केला नाही, असा आक्षेप विरोधकांनी घेतला, आणि देसाई यांनी पुन्हा स्पष्टीकरण केले. नाणार प्रकल्पास असलेला स्थानिकांचा विरोध लक्षात घेतला जाईल, त्यामुळे या प्रकल्पासाठी भूसंपादन करणे अशक्य आहे. तथापि याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असेल, असे त्यांनी सांगितले. स्थानिकांचा विरोध डावलून प्रकल्प रेटला गेल्यास राजीनामा देऊन जनतेसोबत राहीन, असेही त्यांनी जाहीर केले होते.

१४ नोव्हेंबर २०१७ रोजी देसाई यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेतच नाणार प्रकल्पाची तोंड भरून पाठराखण केली होती. या प्रकल्पाचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले होते की, दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पासाठी १५ हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याआधी, १८ मे २०१७ रोजी या प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांत शिवसेनेने प्रकल्पाच्या विरोधातील मोहीम तीव्र केली. मात्र, देसाई यांच्या वेळोवेळी बदलत्या भूमिकांमुळे नाणारमधील प्रकल्पक्षेत्रातील नागरिकांमध्येही संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

भूसंपादनाची अधिसूचना मागे घेतल्याखेरीज उद्धव ठाकरे यांची सभा होणार नाही असा पवित्राच नाणारच्या नागरिकांनी घेतल्याने सोमवारच्या सभेविषयी संभ्रम निर्माण झाला. सभा होणारच असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आणि मोर्चेबांधणी सुरू झाली. सभा पार पडावी यासाठीच अधिसूचना रद्द केल्याची घोषणा देसाई यांना करावी लागली, व त्यामुळेच, ‘आता प्रकल्प गेला’ असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकले. मात्र ‘अधिसूचना रद्द करण्याचा मंत्र्यांना अधिकारच नाही’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी देसाई व ठाकरे यांच्या विधानांची हवा काढून टाकल्याने पुन्हा सेना-भाजपमधील संबंध ताणले गेले.

वादाचा ‘अंक’

मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत उभय पक्षांमध्ये नाणार प्रकल्पावरून वादावादी होणार अशी अटकळ बांधली जात असतानाच, मुख्यमंत्र्यांनी आपल्या दालनातील बंद दरवाजाआड सेनेच्या सर्व मंत्र्यांसोबत सुमारे दहा मिनिटेच चर्चा केली, आणि सेनेचे मंत्री हसतमुखाने बाहेर पडले. मग मंत्रिमंडळाची बैठकही खेळीमेळीत पार पडली. नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव आमच्या खात्याने मुख्यमंत्र्यांना सादर केला असून आता मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील अशी आशा देसाई यांनी व्यक्त केली, आणि ‘नाणार वादा’चा मंगळवारचा अंक संपला..

देसाई यांच्या बदलत्या भूमिका

१४ नोव्हेंबर २०१७ दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पासाठी १५ हजार हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू

२३ एप्रिल २०१८

नाणार प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश मी उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांना देतो

२४ एप्रिल २०१८

मी सोमवारी नाणारला गेलो होतो. जनतेचा तीव्र विरोध लक्षात घेतल्यानंतर मी अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली. मी सचिवांना बोलावून याबाबतचे पत्र दिले आहे. आता ते लवकरच प्रस्ताव सादर करतील.

देसाईंनी राजीनामा द्यावा : चव्हाण

मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून अपमानित झालेल्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

नाणार प्रकल्पाबाबत भाजप व शिवसेना दोन्ही पक्ष जनतेला फसवत आहेत. या सरकारचे आतून कीर्तन आणि बाहेरून तमाशा सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.अपमान सहन करण्यापेक्षा सुभाष देसाई यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, तसेच स्वाभिमान शिल्लक असेल  शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्ष नाणारवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. नाणारवासीयांच्या मर्जीविरोधात हा प्रकल्प या सरकारला रेटून नेता येणार नाही. या संदर्भात प्रदेश काँग्रेसचे शिष्टमंडळ  २८ एप्रिल रोजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. नाणारवासीय राहुल यांची भेट घेणार आहेत, असे चव्हाण म्हणाले.