News Flash

गुजराती समाजाला जोडण्यासाठी शिवसेनेची वर्षभर मोहीम

मेळाव्यात नऊ गुजराती उद्योजकांचा पक्ष प्रवेश

शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या पुढाकाराने मुंबईत रविवारी गुजराती समाजाचा मेळावा झाला. (छाया-अमित चक्रवर्ती)

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर  गुजराती समाजाला पक्षाशी जोडण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून त्यासाठी वर्षभर शहर व उपनगरातील विविध भागांत गुजराती समाजाचे मेळावे घेतले जाणार आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीचा सर्वात जास्त आर्थिक फटका छोटय़ा गुजराती-मारवाडी व्यापाऱ्यांना बसल्याचा मुद्दा त्यासाठी मांडण्यात येणार आहे.

गुजराती समाजाला साद घालण्यासाठी  ‘जिलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’  अशी घोषणा शिवसेनेने केली आहे. रविवारी शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या पुढाकाराने गुजराती समाजाचा मेळावा झाला. करोनामुळे छोटेखानी कार्यक्रम केल्याचे स्पष्टीकरण शाह यांनी भाषणात दिले. शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यावेळी उपस्थित होत्या.

गुजराती समाजातील नऊ उद्योजकांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. कल्पेश मेहता, जयेश सोळंकी, उमेश जोशी, अनिकेत मेहता, राकेश शाह, अतुल शाह, हितेश मेहता, अशोक भोजक व किसन ढाकानी यांचा त्यात समावेश आहे.

शिवसेना आणि गुजराती समाजाचा संबंध विशेषत: नव्या पिढीला समजावून सांगावा लागणार आहे. १९९२-९३ च्या मुंबई दंगलीमधे गुजराती बांधवाना खरी मदत केली व संरक्षण दिले ते शिवसेनेने आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. मी मुंबईकर म्हणून मुंबईतील सर्व धर्मीयांना आपलेपण दिले ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच याची आठवण करून देत गुजराती समाजाला पक्षाशी जोडावे लागेल, असे हेमराज शाह यांनी सांगितले.

तर केंद्र सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीचा सर्वाधिक फटका गुजराती व मारवाडी समाजातील छोटय़ा व्यापाऱ्यांना बसला, अशी टीका राजूल पटेल यांनी केली. शिवसेनेने गुजराती समाजाला नेहमीच संधी दिली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

बटाटेवडा आणि फाफडा

शिवसेना हा मुंबईत मराठी माणसांचा पक्ष मानला जातो आणि बटाटेवडा हा मराठी जनांचा आवडता खाद्यपदार्थ, तर जिलेबी आणि फाफडा हा गुजराती समाजाचा आवडता पदार्थ. शिवसेनेच्या रविवारच्या मेळाव्यात वडापाव आणि जिलेबी आणि फाफडा असे पदार्थ अल्पोपाहार ठेवत वडा आणि फाफडा खाद्ययुतीद्वारे मराठी-गुजराती राजकीय युतीचा मानस व्यक्त करण्यात आला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 1:14 am

Web Title: shiv sena one year campaign to connect gujarati community zws 70
Next Stories
1 प्राचार्याची २६० पदे भरण्यास मंजुरी
2 मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी नवी दिल्लीत वकिलांची बैठक
3 “दोन जिल्हाधिकारी, दोन पालकमंत्री असणाऱ्या शहरासाठी दोन आयुक्त का नसावेत?”
Just Now!
X