ठाण्यातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या स्थलांतराच्या प्रश्नाला आता जातीय राजकारणाचे धुमारे फुटू लागले असून मुंब्रा परिसरातील सुमारे एक हजार कुटुंबांचे स्थलांतर वर्तकनगर येथे करण्याऐवजी कौसातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घरांमध्ये करावे, अशी जाहीर भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे ठाण्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगण्यावरुन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वर्तकनगर भागातील ‘दोस्ती विहार’ प्रकल्पातील सुमारे १४०० घरांचे हस्तांतरण महापालिकेकडे केले आहे. या घरांमध्ये ठाण्यासह मुंब्रा, कौसा परिसरातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन अपेक्षित आहे. मात्र, आपल्या पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या वर्तकनगर परिसरात ‘मुंब्रा’ वसविण्यास शिवसेनेने विरोध सुरू केला असून वागळे, नौपाडय़ातील रहिवाशांचे येथे स्थलांतर करा, अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा या परिसरात सुमारे ११०० इमारती धोकादायक असून त्यापैकी ५७ इमारती अतिधोकादायक आहेत. या अतिधोकादायक इमारती तात्काळ पाडण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरु करताच नेत्यांनी त्यास विरोध केला. रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा, मगच इमारती पाडा, अशी भूमिका सर्वच पक्षांनी मांडली. या मुद्दयावरुन सर्वपक्षीय नेत्यांनी अभद्र युती करत ठाणे बंदही पार पाडले. वाढत्या दबावामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या पुनर्वसनाची घोषणा केली. त्यानंतर तब्बल महिनाभराने एमएमआरडीएने वर्तकनगर भागातील घरांचे महापालिकेकडे हस्तांतरणही केले. तरीही पायाभूत सुविधांअभावी पुनर्वसन प्रत्यक्षात झाले नसतानाच शुक्रवारी पहाटे मुंब्रा रेल्वे स्थानकालगतची इमारत कोसळली. त्यामुळे पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. मुंब्रा भागातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे वर्तकनगरमध्ये पुनर्वसन करावे, असा मुद्दा महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मांडला गेला. मात्र, शिवसेनेने त्याला विरोध केल्यामुळे स्थलांतराच्या मुद्दय़ाला जातीय रंग चढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंब््रयातील रहिवाशांचे त्याच भागात स्थलांतर व्हावे. जेणेकरुन त्यांना आपल्याच परिसरात रहात असल्यासारखे वाटावे. म्हणून शिवसेनेने ही भूमिका घेतली असून त्यास जातीय रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे मत शिवसेनेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 22, 2013 6:24 am