आरेतील वृक्षतोडीला सेनेचा विरोध; वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत तज्ज्ञांचे मत निर्णायक

मुंबई : आरेतील ‘मेट्रो-३’च्या जागेची पाहणी केल्यानंतर शिवसेनेने मंगळवारीच वृक्षतोडीविरोधात जाहीर भूमिका घेत कारशेड निर्मितीच्या अडचणीत भर घातली आहे. सेनेच्या भूमिकेला काँग्रेस-राष्ट्रवादीचीही साथ लाभल्याने बुधवारी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत वृक्षतज्ज्ञांचे मत निर्णायक ठरणार आहे. कारण १९ जणांच्या प्राधिकरणात भाजपच्या मतांना आयुक्तांच्या मताची साथ लाभली तरी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नऊ मतांना मात देण्यासाठी अपुरे आहे.

मेट्रो ३च्या कारशेडसाठी आरेतील ३६९१ पैकी २२३८ वृक्ष तोडणी आणि ४६४ वृक्षांच्या पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव आहे. सेनेने या वृक्षतोडीला विरोध दर्शवीत कारशेडच्या आरेतील प्रस्तावित जागेची पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कडेकोट बंदोबस्तात मंगळवारी ही पाहणी पार पडली.  प्राधिकरणातील नऊ नगरसेवक आणि दोन वृक्षतज्ज्ञ सदस्य यात सहभागी झाले होते. पाहणीनंतर शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांनी तिथल्या तिथेच सेनेचा वृक्षतोडणीला विरोध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी सदस्यांनी मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. भाजप नगरसेविका अलका केरकर यांनी पर्यायी वृक्षलागवड समाधानकारक असल्यास प्रस्तावाबाबत अनुकूल मत नोंदवू, असे स्पष्ट केले. ‘जंगलाच्या आच्छादनाबरोबरच मेट्रोदेखील महत्त्वपूर्ण आहे. झाडे कशी वाचवावी हा मुद्दा महत्त्वाचा आहेच. पण त्याचबरोबर विकासदेखील गरजेचा आहे. त्यामुळे एका वृक्षामागे पाच वृक्ष लावले तर हा पर्याय संयुक्तिक ठरू शकतो,’ असे केरकर यांनी सांगितले.

वृक्षतज्ज्ञांपैकी चंद्रकांत साळुंखे आणि सुभाष पाटणे हे यावेळी उपस्थित होते. ‘वृक्ष प्राधिकरणातील तज्ज्ञ या नात्याने परिस्थितीचे मूल्यमापन करून शास्त्रीयदृष्टय़ा योग्य सल्ला देऊ. कोणत्या वृक्षांचे पुनर्रोपण शक्य आहे, ते सांगू. सरसकट वृक्षतोड होणार नाही आणि विरोधासाठी विरोध असणार नाही,’ असे तज्ज्ञ सदस्य डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी सांगितले. वृक्ष प्राधिकरणावरील नेमणुकांबाबत न्यायालयात धाव घेणारे झोरु  बथेना यांनी यावेळी कारशेडच्या जागेवर मेट्रो ३ ने केलेल्या अनेक बदलांवर आक्षेप नोंदवले. कारशेडच्या जागेवरून वाहणाऱ्या नैसर्गिक झऱ्याची जागा भराव घालून बंद केल्यामुळे भविष्यात पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी अटकाव होण्याची भीती बथेना यांनी व्यक्त केली. कारशेडच्या जागेवरील वृक्ष तोडणी प्रस्तावावरील या घडामोडींसदर्भात मुंबई मेट्रो रेल कापरेरेशनच्या प्रशासनास संपर्क साधला असता त्यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

रानभाज्या, फुलांची भेट

सशस्त्र पोलिसाच्या उपस्थितीत पर्यावरणप्रेमी आणि आदिवासींना या दरम्यान कारशेडच्या जागी जाण्यास अटकाव करण्यात आला. आरेतील आदिवासी पाडय़ांमधील आदिवासी हक्क संघर्ष समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आदिवासींतर्फे यावेळी प्राधिकरणाच्या सदस्यांना येथील जंगलाचे अस्तित्व जाणवून देण्यासाठी रानभाज्या, रानफुले दिली.

तज्ज्ञ सदस्यांच्या भूमिकेकडे लक्ष

आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी झाडे कापण्यापूर्वी जागेची पाहणी केल्यानंतर बुधवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या विषयावर निर्णय होणार आहे. मेट्रोसाठी आरे वसाहतीतील झाडे कापण्यास शिवसेनेचा विरोध कायम असून बुधवारच्या बैठकीतही विरोध करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही या प्रस्तावाला आधीच ठाम विरोध दर्शवला आहे. त्यामुळे प्राधिकरणच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर होणार की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. प्राधिकरणात पाच तज्ज्ञ सदस्य असून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

प्राधिकरणाचे संख्याबळ

’ भाजप                                           ४

’ शिवसेना                                        ६

’ कॉंग्रेस                                            २

’ राष्ट्रवादी                                         १

’ तज्ज्ञ                                               ५

’ अध्यक्ष पालिका आयुक्त                  १