शहर फेरीवाला समितीमार्फत ‘रात्र बाजारपेठे’चा विचार केला जाईल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. तर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पालिका सभागृहात ‘रात्र बाजारपेठे’वरील आयुक्तांच्या अभिप्रायास मंजुरी मिळविण्याच्या तयारीत भाजप आहे. त्यामुळे सभागृहात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने थेट शहर फेरीवाला समितीला पत्र पाठवून ‘रात्र बाजारपेठे’ला विरोध करीत निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्यांचा पाढा वाचला आहे.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘रात्र जीवनाला भाजपकडून कडाडून विरोध झाल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भाजपचे नगरसेवक अमित साटम यांच्या मुंबईत ‘रात्र बाजारपेठ’ सुरू करण्याच्या २०१३ मधील ठरावाच्या सूचनेवर सकारात्मक अभिप्राय सादर करीत प्रशासनाने शिवसेनेला धक्का दिला आहे. मुंबईत राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त केलेली शहर फेरीवाला समिती ‘रात्र बाजारपेठे’बाबत निर्णय घेईल, असे आयुक्तांनी अभिप्रायात स्पष्ट केले आहे. या अभिप्रायास सभागृहात मंजुरी मिळविण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना या अभिप्रायास विरोध करण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत ‘रात्र बाजारपेठे’च्या प्रस्तावास मंजुरी मिळू नये म्हणून शिवसेनेचे नगरसेवक आणि सेंट झेविअर्स महाविद्यालयातील प्रा. अवकाश जाधव यांनी शहर फेरीवाला समितीला आठ पानी पत्र पाठविले आहे.

कारवाई कशी करणार?
‘रात्र बाजारपेठ’ सुरू झाल्यास अनधिकृत फेरीवाल्यांच्या संख्येत भर पडेल. पालिकेच्या परवाना विभागातील सुमारे ८०० अधिकारी-कर्मचारी दिवसा अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. मग ‘रात्र बाजारपेठे’तील अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई कशी करणार? असा सवाल सेना नगरसेवक जाधव यांनी केला आहे.