20 September 2020

News Flash

चर्चा तर होणारच.. ‘भान’ हरपले

विधानसभेवर आणि लाल किल्ल्यावर भगवा फडकावा, हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी हजारो शिवसैनिकांना शिवबंधनाचा गंडा सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सोमय्या मैदानावर बांधला.

| January 24, 2014 03:12 am

विधानसभेवर आणि लाल किल्ल्यावर भगवा फडकावा, हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी हजारो शिवसैनिकांना शिवबंधनाचा गंडा सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सोमय्या मैदानावर बांधला. हा गंडा घातल्यामुळे आता लाल किल्ल्यावर भगवा फडकणार, आणि लाल किल्ल्यावरील पुढचे भाषणही रालोआच्या पंतप्रधानांचेच होणार, असा उत्साही विश्वास या वेळी उद्धवजींच्या वक्तृत्वातून ओसंडत असतानाच, तिकडे एक माशी शिंकली. यंदाच्या सव्वीस जानेवारीला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भाषण देणारे काँग्रेसचे पंतप्रधान अखेरचे असतील, असे उद्धवजींनी मोठय़ा उत्साहात जाहीर केले, आणि शिवसैनिकांनी प्रथेप्रमाणे टाळ्यांचा गजर करीत आवाज कुणाचा.. असा गजरही केला. उद्धवजींच्या या आवेशपूर्ण वक्तव्याने काँग्रेसचे धाबे दणाणेल, असा विश्वास सैनिकांच्या चेहऱ्यावर तरळतानाही दिसू लागला.. पण मुरलेल्या काँग्रेसी राजकारणाने त्यांच्या आवेशाची हवाच काढून टाकली.. का, तर म्हणे, प्रजासत्ताक दिनाला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान भाषणच करीत नसतात. लाल किल्ल्यावरून एकदाच, म्हणजे १५ ऑगस्टला. त्या दिवशी स्वातंत्र्यदिन असतो, असा टोला प्रतिपक्षाकडून हाणला गेला, पण तोवर शिवबंधन सोहळा आटोपत आला होता.. तरीही उद्धवजींचे वक्तव्य आणि काँग्रेसचा टोला यांमुळे सैनिक संभ्रमात सापडले आहेत.
खरे काय?.. चर्चा तर होणारच!
तब्येत सांभाळा
दिल्लीतील वीजदर कपातीनंतर राज्यातही वीजदर कमी करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले, पण मुंबईतील वीजदर कमी करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाच्या मार्गाने निवडणुकीच्या मैदानात उतरलेले स्वपक्षाचे खासदार संजय निरुपम यांच्या पदरी मात्र पहिल्या टप्प्यात निराशाच पडली. २६ लाख मुंबईकर वीजग्राहकांना दिलासा मिळवून देण्यासाठी प्रसंगी आपण बेमुदत उपोषण करू, अशी गर्जना संजय निरुपम यांनी केली होती. ती वृथा जाऊ नये यासाठी जणू सरकारने खबरदारी घेतली. वीजदर कपातीचा मुंबईतील निर्णय सरकारने अधांतरीच ठेवल्याने अखेर गुरुवारी निरुपम यांना उपोषणाला बसावेच लागले. भरपूर खुराक घेऊन बलदंड झालेल्या नामवंत पहिलवानांच्या कुस्तीचे जंगी फड बसविणाऱ्या निरुपम यांना आता निवडणुकीच्या फडात उतरण्याआधी मात्र उपवास करावा लागणार आहे. स्वपक्षाच्या सरकारने उपोषणाची वेळ आणली,  मित्रपक्षाने जखमेवर मीठ चोळले, आणि प्रतिस्पर्धी पक्षाने तर खिल्लीच उडविल्याने निरुपम यांच्या उपोषणास्त्राची जोरदार चर्चा सुरू आहे.
 मुंबईतील वीजदर कपातीचा निर्णय आठवडाभरात होणार असे सरकारनेच स्पष्ट केले आहे, अशी कोपरखळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मारल्याने उपोषणाआधीच निरुपम यांना  राजकीय अशक्तपणा आल्याची चर्चा सुरू झाली असतानाच, निरुपम यांचे उत्तर मुंबईतील संभाव्य प्रतिस्पर्धी भाजपचे गोपाळ शेट्टी यांनीही संधी सोडलेली नाही.. काँग्रेसने करून ठेवलेल्या चुका काँग्रेसनेच सुधारल्या पाहिजेत, त्यामुळे धीर सोडू नका पण प्रकृतीची काळजी घ्या.. अजून कितीतरी मागण्यासाठी स्वपक्षाविरुद्ध उपोषणे करावी लागणार आहेत, असा शालजोडीतील आहेर करणारे फलकच गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईत लावले आहेत म्हणे. या कलगी तुऱ्यामुळे, वीजदर कपातीचा निर्णय होईपर्यंत निरुपम खरोखरीच उपोषण करीत राहणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागणार आहे.
मग चर्चा तर होणारच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 3:12 am

Web Title: shiv sena pledges to grab power in 2014 polls
Next Stories
1 पोलिसांच्या बदल्यांवरून आयपीएस अधिकाऱ्यांच्या संघटनेतच गटबाजी?
2 ‘विक्रांत’ भंगारातच!
3 महिला सुरक्षेसाठी पोलिसांचे ‘आय वॉच’
Just Now!
X