पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शिवसेनेला आदर असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ते छोटा भाऊ मानतात. मात्र या दोन भावांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी तरी करत असून मुख्यमंत्री पदाचे समान वाटप करण्याबाबतची चर्चा त्यांच्यापासून लपवण्यात आली, असा आरोप शिवसेनेने केला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीसह सरकार स्थापनेची चर्चा सुरू असली तरी या दोघांनी अचानक पाठ फिरवली तर भाजपसोबतच्या संवादाची एक सन्मानजनक आडवाट असावी या भूमिकेतूनच मोदींबाबत जिव्हाळ्याची भाषा वापरल्याचे मानण्यात येते.

मुख्यमंत्री पद अडीच वर्षे शिवसेनेला देण्याचे ठरले नव्हते, असा खुलासा केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुलाखतीच्या माध्यमातून केला. त्यानंतर शिवसेनेने त्यास प्रत्युत्तर दिले. मात्र, शहा यांच्यावर नेम धरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शिवसेना अजूनही अनुकूल असल्याचा संदेश देण्याची काळजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत सांगत असताना अमित शहा गप्प का होते? त्यांनी त्या वेळी आक्षेप का घेतला नाही? असा सवाल राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. त्याचबरोबर अमित शहा यांनी युतीच्या सत्तावाटपाची चर्चा पंतप्रधान मोदी यांच्यापासून लपवली, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आदर आहे. युतीतील घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेम केले, त्यांचा आदर केला. उद्धव ठाकरे हे मोदी यांना मोठा भाऊ  मानतात. मात्र या दोघांमधील नाते काही जणांना बघवत नाही. ते दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राऊत म्हणाले.

राजकीय तर्कवितर्क : पंतप्रधान मोदी हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगत होते. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतही मोदी यांनी तसे जाहीर केले होते. तेव्हा ठाकरे यांनी का नाही आक्षेप घेतला, असा सवाल अमित शहा यांनी केला होता. त्यावर, देशाच्या पंतप्रधानांचा अपमान होऊ  नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्यास आक्षेप घेतला नाही. पंतप्रधान म्हणून आम्हाला मोदींची काळजी होती. त्यामुळेच त्यांचे विधान खोडून काढले नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. राऊत यांच्या या विधानानंतर राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क सुरू झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्यावर राग असला तरी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आस्था असल्याचे संकेत शिवसेनेने यातून दिले. मोदी यांच्याशी कोणत्याही कारणाने संवादाची वेळ आली तर अडचण येऊ नये, असे धोरण त्यामागे असल्याचे मानले जाते.