आशीष शेलार यांच्या निषेधार्थ गिरगावात आंदोलन
कुलाबा ते सिप्झ दरम्यान उभारण्यात येणाऱ्या ‘मेट्रो-३’ला विरोध करणाऱ्या शिवसेनेवर टीकास्र सोडणारे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी गिरगावात आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी आशीष शेलार यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. या प्रकरणी १२ जणांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलनामुळे गिरगावातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे गिरगावकरही आश्चर्यचकीत झाले होते.
‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) पालिकेच्या १७ भूखंडांची आवश्यकता आहे. हे भूखंड एमएमआरसीला देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने पालिका सभागृहात सादर केला होता. मात्र शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत हा प्रस्ताव फेटाळून लावला. यावेळी सभागृहात भाजप एकाकी पडली होती. या संदर्भात आशीष शेलार यांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले होते. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी शुक्रवारी गिरगावातील ठाकूरद्वार नाक्यावर दुपारी ४ च्या सुमारास शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी गिरगाव दणाणून सोडला. आशीष शेलार यांच्या पुतळ्याची यावेळी अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अंत्ययात्रा ठाकरद्वार नाक्यावर पोहोचताच शिवसैनिकांनी पुतळ्याचे दहन केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पाडुरंग सकपाळ यांच्यासह १२ जणांना अटक केली आणि काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले.