जलयुक्त शिवारमध्ये घोटाळ्याचा आरोप; समृद्धी योजनेवरून आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोजन घेतले असले तरीही शिवसेनेचा भाजपविरोध काही कमी झालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेपाठोपाठ मुंबई-नागपूर या समृद्धी मार्गाच्या विरोधात शिवसेनेने भूमिका घेतली आहे.

जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा झाला असून या योजनेत चोर आणि दरोडेखोर घुसल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली तसेच आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याशी जलयुक्त शिवार घोटाळ्याची तुलना केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही योजना प्रतिष्ठेची केली असताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मात्र या योजला लक्ष्य केले आहे.

मुंबईतील उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून अजूनही नितीन गडकरी यांचे नाव घेतले जाते. मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग उभारून आपलाही ठसा उमटविण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. मात्र या योजनेला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शिवसेनेनेही ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर आणि परिसरात शेतकऱ्यांची बाजू घेत मुख्यमंत्र्यांच्या अन्य एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खो देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मुद्रांक शुल्कात वाढ करण्याच्या निर्णयालाही शिवसेनेने विरोध केला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपर्यंत भाजपला शिवसेनेची गरज आहे. तोपर्यंत भाजपला लक्ष्य करण्याची शिवसेनेची योजना दिसते. कारण दररोज सत्तेत एकत्र असूनही शिवसेनेकडून भाजप लक्ष्य होत आहे. भाजपच्या नेत्यांना मात्र निमूटपणे सारे सहन करावे लागत आहे.