फडणवीस सरकारचा विस्तार आणि नारायण राणे यांचा संभाव्य समावेश यांच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना-भाजप यांच्यातील संघर्षांने उग्र रूप धारण केले असून सरकारच्या तिसऱ्या वाढदिवसाचे निमित्त साधून सेनेने ‘घोटाळेबाज भाजप’ नावाची एक पुस्तिकाच वितरित केली आहे. सरकारच्या उर्वरित दोन वर्षांत फडणवीस यांना शिवसेनेशीच ‘सामना’ करावा लागेल असे आता स्पष्ट झाले असून, सत्तेबाहेर पडण्याची शिवसेनेची भाषादेखील अधिक ठळक होऊ लागल्याने पुढील काळात सरकारला संख्याबळासाठी कसरतीही कराव्या लागतील असे दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील ‘भाजप’च्या सत्ताग्रहणास काल, ३१ ऑक्टोबर रोजी तीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भाजपच्या गोटात आनंद व उत्साहाचे वातावरण असताना सरकारमधील सहभागी पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र याच मुहूर्तावर सरकारच्या विरोधात अधिक आक्रमक रूप घेतले आहे. सरकारच्या  त्रिवर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेने छापलेल्या ‘घोटाळेबाज भाजप’ या पुस्तिकेचे वाटप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांना केले. या पुस्तिकेत भाजपच्या घोटाळ्यांची माहिती मंत्र्यांच्या छायाचित्रासह देण्यात आल्याने, भाजप सरकारविरुद्ध सेनेने पुकारलेल्या संघर्षांची धार तीव्र झाली आहे. शिवाय, काँग्रेसमधून बाहेर पडून ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन करीत भाजप आघाडीत सहभागी झालेले नारायण राणे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशासही शिवसेनेकडून प्रखर विरोध होत असून, राणे यांचा समावेश झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा अमलात येणार का याविषयीही जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच, ‘निवडणुकांना सामोरे जाण्यास तयार रहा’ असा थेट आदेशही उद्धव ठाकरे यांनी सैनिकांना दिल्याने, फडणवीस सरकारसमोरील संभाव्य धोकेही गडद झाल्याचे मानले जात आहे. राणे यांना राज्य मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे याआधीच स्पष्ट झाले असून, सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर भाजपवर सातत्याने शरसंधानच सुरू ठेवल्याने आगामी दोन वर्षांत सेना-भाजप यांचा संसार एका चुलीवर राहण्याबाबत शंका व्यक्त होत आहेत.

शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या घोटाळेबाज भाजप या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर, एकनाथ खडसे (जमीन गैरव्यवहार), विनोद तावडे (अग्निशमन यंत्रे व फोटो खरेदी घोटाळा), गिरीश बापट (तूरडाळ घोटाळा), दिलीप गांधी (सोनेतारण व कर्जवाटप घोटाळा) या नेत्यांची छायाचित्रेच प्रसिद्ध करण्यात आली असून चिक्की, जमीन, व्यापम, कारगील, खाण, बँक, एलईडी बल्ब, निर्गुतवणूक, कर्जवाटप, आदिवासी साहित्य, सोलार पंप, आदी घोटाळ्यांची मालिकाच मुखपृष्ठावर छापण्यात आली आहे.

या पुस्तिकेमुळे सेना-भाजप यांच्यातील वितुष्टाने टोक गाठल्याचे मानले जात असून, संघर्षांच्या या अखेरच्या अंकाचा शेवट कसा होणार याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

अशा पुस्तिका काढण्यापेक्षा, ज्यामध्ये शिवसेनेला अधिक माहिती आहे अशा, कुपोषण, मुंबईतील खड्डेमय रस्ते, आदिवासी भागातील आरोग्य समस्या व कुपोषण, किंवा एसटी कामगारांचा चिघळलेला संप आदी विषयांवर पुस्तिका काढाव्यात,  घोटाळेबाज भाजप ही पुस्तिका म्हणजे निव्वळ थिल्लरपणा असून अशा गोष्टीना आम्ही फार महत्व देत नाही.   – माधव भांडारी, भाजपचे प्रवक्ते