राज्यातून काँग्रेस-राष्ट्रावीदाल हद्दपार करण्यासाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी सोमय्या मैदानावर सेनेच्या मेळाव्याचे आयोजन केले असून यावेळी शिवसैनिकांना ‘शिवबंधना’च्या धाग्यात प्रतिज्ञाबद्ध करण्यात येणार आहे. या मेळाव्यानिमित्त महायुतीतील भागिदार असलेल्या भाजपलाही सेनेची ताकद दिसणार आहे.
सोमय्या मैदानावरील मेळाव्यासाठी सेनेने जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण राज्यातून शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित राहणार असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणतीही फंदाफितुरी होऊ नये यासाठी भावनिक आवाहनाबरोबरच तुळजा भवानी आणि बाळासाहेबांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी ठेवलेल्या ‘शिवबंधन’ धागा शिवसैनिकांना देण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या बाळासाहेबांनी सांगितलेल्या सूत्राला छेद देत शंभर टक्के राजकारणाचे नवे सूत्र सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार आणण्याचे आवाहन करणाऱ्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावार उद्धव ठाकरे यांनी ‘मार्मिक’ विवेचन करतील अशी अपेक्षाही काही शिवसैनिकांनी व्यक्त केली.