08 March 2021

News Flash

बदलत्या राजकीय गणितानंतर पालिकेत शिवसेनेचेच वर्चस्व

काँग्रेस, राष्ट्रवादीमुळेच प्रभाग समित्यांवर सेनेचा वरचष्मा

महाविकास आघाडी महापालिकेत अप्रत्यक्ष सक्रिय; काँग्रेस, राष्ट्रवादीमुळेच प्रभाग समित्यांवर सेनेचा वरचष्मा

मुंबई : मुंबई महापालिकेत नुकत्याच झालेल्या वैधानिक आणि प्रभाग समित्यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी पालिकेतही अप्रत्यक्षपणे सक्रिय झाली असून त्याचे चित्र येत्या काळात पालिकेतील कामकाजात दिसण्याची शक्यता आहे. आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांमुळे शिवसेनेला महापालिकेतील आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून देता आले.

महापालिकेच्या चार वैधानिक आणि आठ विशेष समित्या व १७ प्रभाग समित्यांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर झालेल्या या निवडणुकांना विशेष महत्त्व होते. पालिकेतही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेत वाटा घेणार की एकमेकांविरोधात लढणार याबाबतच्या चर्चाना ऊत आला होता. या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून जागा खेचून घेण्यासाठी भाजपनेही आपले उमेदवार उभे केले होते. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत पालिकेवरील आपले वर्चस्व टिकवण्यात शिवसेनेला यश आले आहे.

राज्यात यापूर्वी सेना-भाजपची सत्ता असताना पालिकेत पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असल्याचे भाजपने जाहीर केले होते. त्यामुळे वैधानिक व विशेष समित्यांच्या निवडणुका भाजपने लढवल्या नव्हत्या. यंदा मात्र राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे साहजिकच पालिकेतील राजकीय गणितेही बदलली. या बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेकडून जास्तीत जास्त जागा खेचण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र शिवसेनेने रणनीती आखून इथेही भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. यापूर्वी भाजपकडे ९ व शिवसेनेकडे ८ प्रभाग समित्या होत्या. या वर्षी मात्र शिवसेनेकडे तब्बल १२ समित्या असून भाजपला पाच समित्यांवर समाधान मानावे लागले आहे.

पालिकेवर शिवसेनेची सत्ता असली तरी प्रभाग समित्यांमध्ये आतापर्यंत भाजपचे वर्चस्व होते. पालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवार शिवसेनेला थेट मतदान करू शकणार नाहीत हे माहीत असल्यामुळे भाजपने आपल्या जागा वाढवण्यासाठी कंबर कसली होती. मात्र वैधानिक समित्यांमध्ये काँग्रेसने आयत्या वेळी आपले उमेदवार मागे घेतले आणि राष्ट्रवादी व समाजवादी पक्षाने शिवसेनेला मतदान केले, तर प्रभाग समित्या व विशेष समित्यांमध्ये तीनही पक्षांनी मिळून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.

तटस्थ राहण्याचा काँग्रेसचा अधिकार

भाजपने पालिकेत विरोधी पक्षनेते पदावर केलेला दावाही उच्च न्यायालयाने नुकताच फेटाळला. त्यामुळे काँग्रेसच विरोधी पक्षात असल्यावर शिक्कामोर्तब झाले होते; परंतु काँग्रेसने वैधानिक समित्यांमध्ये आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस हा शिवसेनापुरस्कृत विरोधी पक्ष असल्याचा आरोप भाजपतर्फे केला जात आहे. याबाबत शिवसेना नेते, परिवहनमंत्री अनिल परब यांना विचारले असता काँग्रेसने वैधानिक व विशेष समित्यांमध्ये आपले उमेदवार मागे घेतले, मतदान केलेले नाही. विरोधी पक्ष म्हणून त्यांना तटस्थ राहाण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 1:25 am

Web Title: shiv sena retains hold of bmc with help of allies congress ncp zws 70
Next Stories
1 भयगंडामुळे हॉटेल, मद्यालये ओस
2 करोनाशी संबंधित काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला हा गंभीर गुन्हा
3 शहरबात :  नेमके काय साध्य केले?
Just Now!
X