आरे वसाहत वन म्हणून जाहीर करण्याची तसेच आरेतील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेसाठी २६४६ झाडे हटवण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध ठरवून रद्द करण्याची पर्यावरणवादींची मागणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्यामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर शुक्रवारपासून आरेतील वृक्षतोडीला सुरूवात करण्यात आली. यावर ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

संजय राऊत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यायदेवतेच्या डोळ्यावर एक कपडा बांधत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसंच त्यावर ‘आरे हे जंगल नाही’ असंही नमूद करण्यात आलं आहे. या चित्रातून राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण प्रेमींनी दाखल केलेल्या याचिका शुक्रवारी फेटाळल्या. न्यायालयाच्या निर्णयानंतर कारशेडच्या जागेवरील झाडे तोडायला शुक्रवारी रात्रीच सुरुवात झाली. शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. झाडे तोडण्याचं हे काम पोलीस सुरक्षेत सुरू होतं. वृक्षतोडीची माहिती समजाताच विविध ठिकाणाहून अनेक पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले होते. कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला. ‘आरे’मध्ये रात्रभर तणावाचं वातावरण होतं. रात्रभर पोलीस आणि आंदोलकामध्ये घमसान झालं. आंदोलन शांत करण्यासाठी आणि वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच शनिवारी सकाळी आरे कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आलं होतं.