शिवसेनेचा भाजपला घरचा आहेर

विरोधी पक्षांच्या १९ आमदारांचे निलंबन, अर्थसंकल्प मंजूर करण्याचा मुद्दा, आमदारांच्या राजीनाम्याची, मध्यावधीची पुडी सोडण्यासह विधिमंडळात राजकीय चाली खेळण्यात भाजप हुशार ठरले असले तरी राज्यकर्ते म्हणून कमकुवत असल्याचेच पुरते स्पष्ट झाल्याचा घरचा आहेर शिवसेनेने दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून निवासी डॉक्टरांचा संप हाताळण्यापर्यंत अनेक मुद्दय़ांवर सरकार सपशेल नापास झाल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषदा, नगरपालिका तसेच महापालिका निवडणुकीत राजकीय ताकद पणाला लावून भाजपने विजय मिळवला. विधिमंडळातही आघाडी सरकारच्या काळात विरोधकांचा आवाज गप्प करण्यासाठी ज्या युक्त्या-प्रयुक्त्यांचा मुक्तहस्ते वापर केला जात होता तो कमी ठरावा एवढी हुशारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सध्या दाखवत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना आक्रमक झाली. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही ठोस गोष्टी जाहीर होतील या अपेक्षेने शिवसेनेने अर्थसंकल्प मांडू दिला. मात्र अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हाती काहीच न लागल्यामुळे शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा किल्ला लढविण्याचा निर्धार केल्याचे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सांगितले. त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर होताना अडचणी येऊ शकतील हे लक्षात घेऊन अर्थसंकल्पात गोंधळ घातल्याचा मुद्दा उपस्थित करत १९ आमदारांना ३१ डिसेंबपर्यंत निलंबित केले. खरे म्हणजे २१ आमदारांना निलंबित केले जाणार होते. यात प्रणिती शिंदे व नितेश राणे यांना मात्र हुशारीने वगळण्यात आल्याचे दिसत असल्याचे परब यांनी सांगितले. आघाडी शासनाच्या काळात ज्याप्रमाणे सेना-भाजपच्या आमदारांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवली जायची त्यापेक्षा हुशारीने १९ आमदारांचे निलंबन करण्यात आले.

विधान परिषदेत कामकाजच ठप्प झाले आहे. मुख्यमंत्रीही अपवादानेच सभागृहात येत असून सारे काही ठरल्याप्रमाणे होत आहे. विधिमंडळाच्या राजकारणात भाजप हुशारीने पावले टाकत असले तरी राज्यकर्ते म्हणून कमकुवत असल्याचेच चित्र यातून निर्माण होत असल्याचे परब यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, शेतमालाला हमीभाव नाही, विकासाच्या कामांसाठी तिजोरीत पैसा नाही, केवळ अर्थसंकल्पात हातचलाखी  करण्याची कल्पकता अर्थमंत्र्यांनी केली आहे.  चार दिवस निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने हजारो रुग्णांना वेठीला धरल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री सभागृहात हतबलता व्यक्त करतात, तर मुख्यमंत्री हातापाया पडण्याची भाषा करतात हे चित्र उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाले. शिवसेनेनेच रुग्णांसाठी आवाज उठवल्यानंतर दोन वेळा कामकाज तहकूब झाले आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन करावे लागल्याने राजकारणात हुशार असलेले भाजप राज्यकर्ते म्हणून हतबल असल्याचेच दिसून येत असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.