News Flash

‘दुष्काळकर’ ही तर पाकीटमारी! शिवसेनेची सरकारवर टीका

शिवसेनेने पेट्रोल, डिझेलच्या करवाढीवरून भाजपला लक्ष्य करताना ही सरळसरळ पाकीटमारी असल्याचा थेट हल्ला चढविला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेने पेट्रोल, डिझेलच्या करवाढीवरून भाजपला लक्ष्य करताना ही सरळसरळ पाकीटमारी असल्याचा थेट हल्ला चढविला आहे. तसेच बिहारप्रमाणे महाराष्ट्राला विशेष पॅकेज पंतप्रधानांनी मंजूर करावे, अशी मागणी करीत करवाढीवरून भाजपची कोंडी करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न केला आहे.

मुंबईतील नालेसफाईच्या कामात झालेला भ्रष्टाचार, रस्त्यांच्या कामांवरून महापौरांचे पत्र यावरून भाजपने शिवसेनेबद्दल संशयाचे वातावरण तयार केले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना बदनाम होईल अशा पद्धतीने भाजपने पावले टाकली आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने पेट्रोल, डिझेलवर दोन रुपये अधिभार तसेच अन्य करवाढीवरून भाजपबद्दल जनतेच्या मनात विरोधी भूमिका तयार करण्यावर भर दिला आहे. व्यापाऱ्यांच्या फायद्याकरिताच भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेवर करवाढ लादल्याची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली असतानाच मित्रपक्ष शिवसेनेनेही करवाढीस विरोध करून भाजपला एकाकी पाडले आहे.

करवाढ करून भाजपने पाकीटमारी केली आहे. जनतेवर करवाढ लादण्याऐवजी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मंजूर करून घ्यावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. करवाढ करून शेतकऱ्यांचे प्रश्न खरोखरीच सुटतील का, असा सवालही शिवसेनेने केला आहे. बिहारसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सवा लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. मुंबईतून कररूपाने केंद्राच्या तिजोरीत लाख-सवा लाख कोटी रुपयांची भर पडते. त्यातील पाच-पंचवीस हजार कोटी केंद्राने महाराष्ट्राला दिले तरी अनेक प्रश्न सुटतील, असेही शिवसेनेने म्हटले आहे. सत्तेत शिवसेना सहभागी झाल्यापासून भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये परस्परांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा लागली आहे. गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवांपासून प्रत्येक मुद्दय़ावर शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न राहिला आहे. कोकणात रासायनिक विभाग उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करताच शिवसेनेने त्याला विरोध केला.  पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने शिवसेनेला जास्तीत जास्त बदनाम करण्यावर भर दिला असताना शिवसेनाही भाजपवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही, असे चित्र आहे.

 

पेट्रोल व डिझेलवरील कर वाढवून भाजपने पाकीटमारी केली आहे. राज्य सरकारने जनतेवर करवाढ लादण्याऐवजी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मंजूर करून घ्यावे. पंतप्रधानांनी बिहारप्रमाणेच महाराष्ट्रालाही विशेष पॅकेज मंजूर करावे.

– उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 3:21 am

Web Title: shiv sena slams bjp over tax hike in maharashtra
टॅग : Shiv Sena
Next Stories
1 इंद्राणी मुखर्जीचा आत्महत्येचा प्रयत्न? कारागृहात बेशुद्धावस्थेत सापडली
2 मुंबईत ‘स्वच्छता अभियाना’चा जागर
3 आई नको, मला बाबांसोबत राहायचे आहे.. १४ वर्षांच्या शाळकरी मुलाची न्यायाधीशांकडे याचना
Just Now!
X