News Flash

सेनेला झोपडीच्या वरच्या मजल्यावरील रहिवाशांचा पुळका

मुंबईमध्ये झोपडपट्टय़ांमध्ये इमले चढू लागले असून झोपडीच्या वरच्या मजल्यावर वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टीवासीयांचा आता शिवसेनेला पुळका आला आहे.

| February 14, 2015 02:59 am

मुंबईमध्ये झोपडपट्टय़ांमध्ये इमले चढू लागले असून झोपडीच्या वरच्या मजल्यावर वास्तव्य करणाऱ्या झोपडपट्टीवासीयांचा आता शिवसेनेला पुळका आला आहे. झोपडीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्यांचाही ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’त समावेश करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही.

झोपडपट्टीवासीयांना चांगले घर मिळावे यासाठी राज्य सरकारने ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजना’ सुरू केली. सध्या मुंबईमध्ये झोपडपट्टय़ांच्या पुनर्विकासाच्या १२०० योजना सुरू असून त्यातील ४.५ लाख झोपडपट्टीवासीयांना हक्काचे पक्के घर मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झोपडय़ांवर सर्रास मजले चढविण्यात आले आहेत. काही झोपडपट्टय़ांमध्ये तीन-चार मजली झोपडय़ा आकारास आल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी मुंबई अधिकच बकाल दिसू लागली आहे. मात्र त्याविरुद्ध ना राज्य सरकार कारवाई करीत ना पालिका प्रशासन.
मुंबईत बहुसंख्य झोपडपट्टय़ांमध्ये एकमजली घरे उभारण्यात आली असून तळमजल्यावर झोपडपट्टी मालक, तर वरच्या मजल्यावर भाडेकरू राहत आहेत. ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’मध्ये तळमजल्यावरील मालकाला हक्काचे घर मिळण्याची तरतूद आहे. मात्र वरच्या मजल्यावरील झोपडपट्टीवासीयाला कायद्यानुसार घर मिळत नाही. मात्र आता झोपडय़ांच्या वरच्या मजल्यावरील रहिवाशांचा शिवसेनेला पुळका आला आहे.
मूळ झोपडीच्या पहिल्या मजल्यावरील खोली खरेदी करून अनेकांनी त्यात आपले संसार थाटले आहेत. अनेकांनी पहिल्या मजल्यावरच व्यवसायही सुरू केले आहेत.
अशा झोपडय़ांच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत वास्तव्यास असणाऱ्याकडे वास्तव्याचे पुरावे असल्यास त्यांनाही ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’त सामावून घ्यावे, अशी मागणी माजी महापौर आणि आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. पात्र-अपात्रतेच्या प्रश्नामुळे ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजनां’ना खीळ बसत आहे. त्यामुळे १ + १ झोपडय़ांमधील पहिल्या मजल्यावरच्या रहिवाशालाही पात्र ठरवून घर द्यावे. त्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक ती सुधारणा करावी. त्यामुळे या योजना जलदगतीने मार्गी लागतील, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 2:59 am

Web Title: shiv sena slum bmc
टॅग : Bmc,Shiv Sena
Next Stories
1 न्यायालयातील संग्रहालयाला मुहूर्त
2 दप्तराचे ओझे कमी होणार!
3 सेवकाचा पुढे सम्राट कसा होतो, ते अनुभवले आहे – शिवसेनेचा मोदींना टोला
Just Now!
X