08 July 2020

News Flash

ईशान्य मुंबईवर शिवसेनेचे खास लक्ष

मातोश्री’च्या विश्वासातील आदेश बांदेकर यांच्याकडे शिवसेनेने या भागाची जबाबदारी सोपविली आहे.

आदेश बांदेकर यांच्यावर जबाबदारी
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रत्येक जागा शिवसेनेसाठी महत्त्वाची असल्याने सेना नेतृत्वाने मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी आदी मराठी वस्ती असलेल्या ईशान्य मुंबईत खास लक्ष घातले आहे. ‘मातोश्री’च्या विश्वासातील आदेश बांदेकर यांच्याकडे शिवसेनेने या भागाची जबाबदारी सोपविली आहे.
ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मातोश्री आणि थेट ठाकरे कुटुंबीयांवर आरोप केल्याने शिवसेनेने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. सोमय्या यांना फार काही महत्त्व द्यायचे नाही, पण त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी किंवा घाटकोपरमधील मराठी वस्तीत शिवसेनेला यश मिळू शकते हे लक्षात घेऊन शिवसेनेने नेत्यांची फौज उतरविली आहे. आदेश बांदेकर यांच्याकडे मुख्य जबाबदारी देतानाच रवींद्र मिर्लेकर, विनोद घोसाळकर, अजय चौधरी या खास शिलेदारांना निरीक्षक म्हणून ईशान्य मुंबईत धाडले आहे. अलीकडेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.
महिन्याभरापूर्वी निरीक्षक म्हणून बांदेकर यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी ईशान्य मुंबईतील शिवसेनेच्या स्थानिक विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विभाग संघटक, शाखाप्रमुख या पदाधिकाऱ्यांच्या प्रथम बठका घेतल्या. या बठकीत त्यांनी स्थानिक गटप्रमुखांशी प्रत्येकाशी थेट बोलणार असल्याचे सांगितले. त्यानुसार गटप्रमुख घरोघरी जातात का, त्यांचा संपर्क याच्याविषयी माहिती त्यांनी करून घेतली. महिन्याभरानंतर पुन्हा बांदेकर यांनी गटप्रमुखांशी थेट संपर्क साधून त्यांच्याशी व्यक्तिगत संवाद साधला. मुलुंडपाठोपाठ ईशान्य मुंबईतील इतर मानखुर्दपर्यंतचा काही भाग बांदेकरांनी पिंजून काढला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यावर आणि मतदारांशी व्यक्तिगत संपर्क साधण्यावर गटप्रमुखांना सांगण्यात आले आहे. विक्रोळी ते मुलुंड विभागाचे विभागप्रमुख आणि माजी महापौर दत्ता दळवी यांनी गटप्रमुखांशी थेट भेटी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात आल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला. सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलण्याचे त्यांनी टाळले. त्याच वेळी ‘सोमय्या यांनी पुन्हा येथून निवडून येऊन दाखवावे,’ असे आव्हानही त्यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 3:06 am

Web Title: shiv sena special attention north mumbai
टॅग Shiv Sena
Next Stories
1 ‘वांद्रय़ाचा साहेब कोण?’
2 महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी सात जणांना अंतरिम जामीन
3 मुंबई ते अमरावती.. रक्ताचा थरारक प्रवास!
Just Now!
X