‘करून दाखविले’ऐवजी ‘तुम्हाला हे माहीत आहे का?’
पालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांचा चेष्टेचा विषय बनू नये म्हणून ‘करून दाखविले’ऐवजी ‘तुम्हाला हे माहीत आहे का?’ अशी सावध जाहिरातबाजी करीत शिवसेनेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या आणि पुढील पाच वर्षांत करण्यात येणाऱ्या कामांचा लेखाजोखा मतदारांपुढे मांडण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये बॅनर्स झळकावून साकारलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने ‘करून दाखविले’ या ठळक मथळ्याखाली पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मुंबईकरांना पेश केला होता. बस थांबे, सार्वजनिक ठिकाणे, मोक्याचे चौक अशा विविध ठिकाणी ‘करून दाखविले’चे बॅनर्स झळकविण्यात आले होते. पाणी, स्वच्छता, रस्ते, धरण आदी विविध खात्यांशी संबंधित राबविलेल्या प्रकल्पांची माहिती या बॅनर्सवरून मिरवण्यात आली होती. त्यामुळे विरोधकांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले होते. इतकेच नव्हे तर पालिका निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या शिवसेनेला विरोधकांनी ‘करून दाखविले’वरून अनेक वेळा हिणविले होते. गेल्या पाच वर्षांत ‘करून दाखविले’ हा चेष्टेचा विषय बनविला होता. स्थायी समिती आणि पालिका सभागृहाच्या बैठकीमध्ये अनेक वेळा ‘करून दाखविले’चा विरोधकांनी उद्धार केला होता. विरोधकांच्या टीकेला भविष्यातही ‘करून दाखवूच’ असे प्रत्युत्तर शिवसेनेच्या नगरसेवकांकडून देण्यात आले.
शिवसेनेच्या ‘करून दाखविले’प्रमाणेच आता ‘तुम्हाला हे माहीत आहे का’ या जाहिरातबाजीचीही चेष्टा करण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे, तर एकीकडे ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’चे नारे द्यायचे आणि दुसरीकडे बॅनरबाजी करायची असा अशी टीका विरोधकांकडून होऊ लागली आहे.
प्रकल्पांची जाहिरातबाजी
पालिकेच्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेने ‘तुम्हाला हे माहीत आहे का?’ अशा आशयाचे बॅनर्स झळकवून गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची जाहिरातबाजी करायला सुरुवात केली आहे. पुढील पाच वर्षांमध्ये कोणते प्रकल्प राबविणार याचाही लेखाजोखा या बॅनर्सवर देण्यात आला आहे. काही ठिकाणी झळकविलेल्या बॅनर्सवर ‘जगातील ९ वे सर्वात जलतगतीने बांधलेले धरण मुंबई महापालिकेचे. बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण!’, तसेच ‘महापालिका करणार कोस्टल रोड. नरिमन पॉइंट ते दहिसर २० मिनिटांत! निघा सुसाट..’ अशी प्रकल्पांची जाहिरातबाजी करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2017 12:56 am