चंद्राबाबूंच्या नवी दिल्लीतील उपोषणाला पाठिंबा

मुंबई : ‘रालोआ’मधून बाहेर पडणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमशी शिवसेनेची जवळीक सोमवारी अधिक घट्ट झाली. युती होणारच, असे भाजपचे नेते मुंबईत सांगत असताना शिवसेनेने दिल्लीत चंद्राबाबूंच्या उपोषणास पाठिंबा देत भाजपला धक्का दिला. भाजप युतीधर्माचे पालन करीत नसल्याच्या शिवसेनेच्या सुरात सूर मिसळून चंद्राबाबू रालोआतून बाहेर पडले तेव्हाही शिवसेनेने त्यांची जोरदार पाठराखण केली होती. त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्राबाबूंच्या उपोषणस्थळी जाऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केल्याने सेना दबावतंत्राचा वापर करत आहे काय, अशी चर्चा सुरू झाली.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी नवी दिल्लीत एक दिवसाचे उपवास आंदोलन केले, आणि त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांची उपोषणस्थळी रीघ लागली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, आदी नेत्यांसमवेत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही चंद्राबाबूंच्या उपोषण मंडपात हजेरी लावून त्यांच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. भाजपने शब्द न पाळल्याने आंध्र प्रदेशच्या अस्मितेस डिवचले आहे, असा आरोप आज उपोषण सुरू करताना चंद्राबाबूंनी केला.  गेल्या वर्षी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अशीच आगपाखड करीत स्वबळाचा नारा दिला होता. पुढे काही दिवसांतच रालोआमधून बाहेर पडून चंद्राबाबूंनी भाजपला जोरदार धक्का दिला. शिवसेनेच्या प्रेरणेमुळेच चंद्राबाबू रालोआतून बाहेर पडले, असा दावा खासदार राऊत यांनी तेव्हा केला होता. गेल्या वर्षभरात चंद्राबाबू व शिवसेना यांची जवळीक अधिकच वाढली. चंद्राबाबू व उद्धव ठाकरे यांच्यात खलबते होत असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या.

केंद्रातील व महाराष्ट्रातील सत्तेत शिवसेना सहभागी असली तरी सेना-भाजपमधील दरी दिवसेंदिवस रुंदावत असून भाजपच्या नेतृत्वाविषयीची सेनेची नाराजी लपून राहिलेली नाही. भाजपवर हल्ला चढविण्याची एकही संधी सेनेने सोडलेली नाही. सेनेच्या मुखपत्रातून भाजपच्या कारभारावर नेहमीच कोरडे ओढले जात असतानाही, युतीसाठी आशावादी असलेल्या भाजपने नंतर आपला सूर कायमच मवाळ ठेवून सेनेशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली. शिवसेनेशी युती व्हावी यासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे सर्व भाजप नेते प्रयत्नशील असताना राऊत यांनी चंद्राबाबूंची पाठराखण करून भाजपला नवा इशारा दिल्याचे मानले जात आहे.

विरोधकांच्या एकीचे प्रदर्शन

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत थेट दिल्लीत येऊन उपोषणाला बसलेले तेलुगू देसमचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या बारा तासांच्या उपोषणाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्याने भाजप आणि मोदीविरोधातील एकी पुन्हा पाहायला मिळाली.

२०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मोदी सरकारने केली नसल्याचा आरोप करत चंद्राबाबू नायडू दिल्लीतील आंध्र भवनात सकाळी आठ वाजता उपोषणाला बसले. ‘धर्म परोटा दीक्षा’ म्हणजेच ‘न्यायासाठी दिवसभर आंदोलन’ सुरू झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी आंध्र भवनमध्ये नायडूंची भेट घेऊन विशेष राज्याच्या मागणीला पाठिंबा दिला.

लोकसभेत तेलुगू देसमच्या सदस्यांनी याच मागणीसाठी घोषणाबाजी केली. तेलुगू देसमचा राज्यातील विरोधक वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांनीही त्यांना साथ दिल्याचे आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुलायम सिंह यादव, अरविंद केजरीवाल, फारुक अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन तसेच  माजी पंतप्रधान  मनमोहन सिंग,काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आदी नेत्यांनीही नायडू यांची भेट घेतली.