राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या मुद्दय़ावरून शिवसेनेचा सूर नरमाईचा असून त्याबदल्यात शिवसेनेला काय मिळणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे. युती तोडून भाजप नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले, केंद्रात शिवसेनेच्या वाटय़ाचे मंत्रीपद दिलेच नाही, राज्यात दुय्यम खात्यांची मंत्रिपदे व महामंडळांचे वाटपही नसताना स्वतच्या फायद्यासाठी भाजप शिवसेनेचा उपयोग करून घेत आहे. ‘भाजपच्या पाठीमागे फरपटत जाणार नाही,’ असे ठाकरे यांनी अनेकदा सांगूनही आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा हवा असल्यास ‘मातोश्री’वर चर्चेला यावे, अशी भूमिका घेतल्यावर शिवसेनेने अचानकपणे भूमिका बदलण्याचे कारण काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) घटक पक्षांची बैठक सोमवारी नवी दिल्लीत आयोजित केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा हे घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतील. शिवसेनेकडे असलेली २५ हजार मते ही भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने आतापर्यंत फारशी किंमत देत नसूनही अमित शहा यांनी ठाकरे यांना दूरध्वनी करून बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले. ठाकरे हे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे ज्येष्ठ शिवसेना नेत्याने सांगितले. ठाकरे यांचे हे अचानक घूमजाव कशामुळे, याची कारणे मात्र गुलदस्त्यात आहेत.

भाजपने शिवसेनेशी युती तोडली. विधानसभा, नगरपालिका, महापालिका या निवडणुका स्वबळावर लढण्यात आल्या. ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. मोदी व शहा यांनी ठाकरे यांना आतापर्यंत फारशी किंमतही दिलेली नाही. नोटाबंदीनंतर ठाकरे यांनी प्रचंड विरोध केला, ते नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटले. पण मोदी व शहा यांनी त्यांच्याशी चर्चाही केली नाही किंवा संपर्कही साधला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात अनंत गीते हे एकमेव शिवसेना मंत्री असून विस्ताराच्या वेळी शिवसेनेला विचारलेही गेले नाही व आणखी एक मंत्रीपद शिवसेनेला दिले गेले नाही. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दुय्यम मंत्रिपदे देऊन बोळवण केली व महामंडळांचे वाटप अडीच वर्षे झाले तरी अजून केलेले नाही. उलट पारदर्शी कारभाराच्या मुद्दय़ावर शिवसेनेवर झोड उठविली. त्यामुळे भाजपमागे फरपटत न जाण्याची आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंब्यासाठी ‘मातोश्री’वर येऊन चर्चा करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती.

प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला डावलून त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र भाजपखेरीज आता शिवसेनेला पर्याय नाही आणि भाजपखेरीज अन्य उमेदवाराला पाठिंबा दिल्यास त्यातून राजकीय अडचण होईल, या अपरिहार्यतेतून ठाकरे यांना दिल्लीला जाऊन भाजपला पाठिंबा देणे भाग पडणार आहे. ठाकरे अनुपस्थित राहिल्यास किंवा भाजपला पाठिंबा न दिल्यास मोदी व शहा चिडले तर ते केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातूनही शिवसेनेला डच्चू देतील, अशीही भीती आहे. सत्तेतून बाहेर पडणे, हे शिवसेनेला सध्या परवडणारे नसल्याने नरमाईची भूमिका घेणे शिवसेनेला भाग पडत असल्याचे समजते.

शेतकरी कर्जमाफीसह अनेक मुद्दय़ांवर भाजपशी शिवसेनेचा संघर्ष सुरू आहे, भाजपला घटक पक्षांची गरजच उरली नसल्याने रालोआचे अस्तित्व नाममात्रच असून महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी विश्वासात घेतले जात नाही व भाजपच्या फायद्यासाठी केवळ वापर केला जातो. या परिस्थितीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यास शिवसेनेला काय मिळणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे रालोआच्या बैठकीत उपस्थित राहणार?

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) नेत्यांची बैठक सोमवारी दिल्लीत होत असून, त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपप्रणीत रालोआ २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यानंतर घटक पक्षांची ही दुसरी बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.

तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासह घटक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रीही बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबरोबरच देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन रालोआ मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात येणार आहे.