शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त अनेक शिवसैनिकांनी आज पहाटेपासूनच त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यास सुरुवात केली आहे. शिवाजीपार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला आज हजारो शिवसैनिक भेट देणार आहेत. या शिवसैनिकांच्या सोयीसाठी सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळात विशेष बसची सेवाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सामान्य शिवसैनिकांबरोबरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आज या स्मृतीस्थळाला भेट देतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. आज महापौर निवासात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या वेबसाईटचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.
काही महत्वाची नेते मंडळीही आज शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून शिवसेनेने शेतकऱ्यांना मदत म्हणून गोळा केलेल्या दोन कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहे.

वाळू शिल्पाचे आकर्षण

यंदाच्या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळच त्यांचे वाळू शिल्प साकारण्यात आले आहे. लक्ष्मी कांबळे या शिवसैनिक महिलेने हे शिल्प साकारले आहे.

विशेष बसेस

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी राज्यभरातून शिवसैनिक येण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सोयीसाठी विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे. दादर (पश्चिम) स्थानक, कबुतरखाना, वीर कोतवाल उद्यान, राम गणेश गडकरी चौक, गोखले रस्ता, रानडे रस्ता, शिवाजी पार्क या मार्गावर सकाळी सात ते संध्याकाळी सात अशी बारा तास विशेष बससेवा सुरु राहणार आहे.