केजरीवाल जिंकले; मग हरले कोण?, असा खोचक सवाल करत शिवसेनेने बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मंगळवारी आम आदमी पक्षाकडून (आप) मोठ्या फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेऊन भाजपला पराभवावरून अनेक टोले लगावले होते. त्यानंतर बुधवारी अपेक्षेप्रमाणे शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपला अनेक खडे बोल सुनाविण्यात आले आहेत. 

ज्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला शतप्रतिशत विजय मिळवून दिला त्याच दिल्लीकर जनतेने ‘आप’च्या केजरीवाल यांचा झाडू हातात घेऊन भाजपचा कचरा केला, अशी बोचरी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे. भाजप दोन आकडी संख्या तर सोडा, एका हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्या जागाही मिळवू शकलेला नाही. याचे खापर फक्त किरण बेदींवर फोडून चालणार नाही. ज्या केजरीवाल यांना ‘भगोडा’ आणि ‘पळपुटा’ म्हणून प्रचाराचा मुद्दा बनवला त्याच केजरीवाल यांच्या पाठीशी दिल्लीची जनता का उभी राहिली? पंतप्रधान मोदी यांचे वास्तव्य आता दिल्लीतच असते, पण इतक्या जवळ असूनही यावेळी मोदी यांचे ब्रह्मास्त्र चालले नाही. अमित शहा यांची निवडणूक जादू चालली नाही. दिल्लीचा निकाल हा अनेक अर्थांनी लागलेला अनेकांचा निकाल आहे. फक्त घोषणा व भाषणांवर निवडणुका जिंकता येत नाहीत, असे झोंबणारे विधानही या अग्रलेखात करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

हिंमत असेल तर सत्ता सोडा! आशीष शेलार यांचे शिवसेनेला आव्हान