नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील अपयशाच्या मुद्द्यावरून शिवसेनेकडून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रातील आजच्या अग्रलेखात महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल भाजपची ‘काशी’ करणारे असल्याचे म्हटले आहे. राज्यातील १९ नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने लक्षणीय मुसंडी मारल्यामुळे भाजप चौथ्या क्रमांकावर फेकला गेल्याचे दिसून आले. याच मुद्द्यावरून सेनेने भाजपवर झोंबरी टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीत भारतीय जनता पक्षाचा अतिदारुण पराभव व्हावा ही सगळ्यांसाठीच चिंतेची बाब आहे.काशीतील राजकीय निकालाने उत्तर प्रदेशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते दिसते, पण महाराष्ट्रातील ज्या १९ नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्याचे सर्व निकालही भाजपची ‘काशी’ करणारेच असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यांमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.
याशिवाय, बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराच्या भूमिकेचा आधार घेत सत्तेचा बैल मालकांना कधी उलथवून टाकेल त्याचा नेम नसतो असा इशाराही सेनेकडून या अग्रलेखाद्वारे भाजपला देण्यात आला आहे. नगरपालिका निवडणुकांतील काँग्रेसची मुसंडी हा ‘ट्रेलर’ आहे व मुख्य सिनेमा सुरू व्हायचा आहे. या लहानसहान निवडणुकांतूनच लोकांचे मन ओळखायला हवे. ज्या लोकांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोदींची हवा निर्माण केली त्या हवेतच लोकांना गुदमरल्यासारखे होत असेल तर ‘काय चुकतेय?’ हे एकत्रित बसून तपासायला हवे. सत्तेचा वापर पक्षबांधणी वगैरेसाठी केला जातो असे म्हणतात, पण अशा बांधण्या म्हणजे गाड्यास जुंपलेल्या बैलासारख्या ठरतात. जोखड झुगारून बैल कधी उधळेल व गाड्यावरच्या मालकांना कधी उलथवून टाकेल त्याचा नेम नसतो, असे या अग्रलेखाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.