ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या यशानंतर नव्या समीकरणांची चर्चा

ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला रोखण्याकरिता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पडद्याआडून केलेला समझोता यशस्वी झाला आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. विधानसभा निवडणुकीतही याच पद्धतीने परस्परांना मदत करावी, अशी चर्चा गेले काही दिवस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये असली तरी उघडपणे तसा समझोता करणे शक्य होणार नाही.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेत भाजपला राज्यात यश मिळाले. हा कल पुढे सुरू राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात असतानाच महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाले. भाजपने राज्यात आपला पाया अधिक भक्कम केला. भाजपच्या या यशाने विरोधकांमध्ये साहजिकच धास्ती निर्माण झाली. भाजपची चढती कमान अशीच सुरू राहिल्यास आपले काही खरे नाही, अशी भीती शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भेडसावू लागली.

भाजपला रोखण्याकरिता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांनी एकत्र यावे, या दृष्टीने चाचपणी सुरू झाली. या तीन पक्षांचे विधानसभेत एकत्रित संख्याबळ १४६ एवढे आहे. भाजप सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात यावा, असा प्रस्तावही पुढे आला होता. पण शिवसेनेला राष्ट्रवादी कितपत साथ देईल याबाबत साशंकता होती. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी लगेचच भाजपला पाठिंबा देईल, असा शिवसेनेत मतप्रवाह होता. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यास आपल्याला फटका बसेल व त्याचा भाजपला फायदा होईल, ही शिवसेनेला भीती होती. उत्तर प्रदेशच्या भाजपच्या विजयानंतर राज्यातही मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असा भाजपमध्ये मतप्रवाह होता. तेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने परस्परांना मदत करावी, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली होती.

ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला रोखण्याकरिता शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळीच व्यूहरचना केली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने राष्ट्रवादीला बरोबर घेतले. याचप्रमाणे काँग्रेसला त्यांची ताकद असलेल्या मतदारसंघात मदत केली. परिणामी काँग्रेसची एक जागा बिनविरोध निवडून आली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी पडद्याआडून परस्परांना मदत केली. फक्त शहापूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत लढत झाली. कारण या तालुक्यात भाजप नगण्य असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच लढत आहे.

राज्यातील विजयाची परंपरा कायम ठेवण्याकरिता भाजपने सारी ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी जिल्हा परिषद जिंकण्याकरिता जंगजंग पछाडले होते. पण भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेपाठोपाठ ठाणे जिल्हा परिषदेत कपिल पाटील यांना अपयशच आले. कारण भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेसला बहुमत मिळाले होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे, असे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेबरोबर उघडपणे काँग्रेसला हातमिळवणी करता येणार नाही. कारण शिवसेनेबरोबर गेल्यास अल्पसंख्याक मतांवर परिणाम होऊ शकतो. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला शिवसेनेबरोबर हातमिळवणी करणे शक्य नव्हते. यामुळेच शिवसेनेची ताकद असलेल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेस वा राष्ट्रवादीने कमकुवत उमेदवार उभे करावेत. अशाच पद्धतीने काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेने पडद्याआडून मदत करावी, असा प्रस्ताव आहे. अर्थात, हे प्रत्यक्षात येणे तेवढे सोपे नाही. कारण प्रत्येक पक्षाला अन्य पक्षांनी आपल्याला जास्त मतदारसंघांत मदत करावी, अशी भूमिका राहील.

बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना आपल्या अस्तित्वाची काळजी वाटते. भाजप आणि शिवसेनेची मतपेढी साधारपणे सारखीच आहे. उजव्या विचारसरणीची मते भाजपकडे अधिक वळू लागल्यास त्याचा शिवसेनेवर परिणाम होऊ शकतो. शिवसेनेची प्रामुख्याने ताकद ही मुंबई, ठाणे पट्टय़ात आहे.

मुंबईत फक्त मराठी मतांवर टिकाव लागणे हे शिवसेनेला यापुढील काळात शक्य होणार नाही. कारण मुंबईतील उत्तर भारतीय, गुजराती मतदार भाजपच्या मागे उभे राहू लागल्याने विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले. अशा वेळी हिंदुत्व व मराठी यात मध्यमार्ग शिवसेनेला काढावा लागेल.

राष्ट्रवादीचे भवितव्यच अधांतरी आहे. पक्षाची गेल्या तीन वर्षांत सातत्याने पीछेहाट होत गेली. पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला. अशा वेळी लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान आहे. भाजपपुढे काँग्रेसचा निभाव लागणे कठीण आहे. राज्यात विरोधकांची भूमिका बजाविण्यात काँग्रेसला तेवढे यश आलेले नाही. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा प्रश्न कायम आहे.

ज्याचे त्याचे राजकीय लाभाचे गणित

भाजपला रोखण्याकरिता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांनी एकत्र यावे, या दृष्टीने चाचपणी सुरू झाली. या तीन पक्षांचे विधानसभेत एकत्रित संख्याबळ १४६ एवढे आहे. भाजप सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात यावा, असा प्रस्तावही पुढे आला होता. पण शिवसेनेला राष्ट्रवादी कितपत साथ देईल याबाबत साशंकता होती. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी लगेचच भाजपला पाठिंबा देईल, असा शिवसेनेत मतप्रवाह होता. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यास आपल्याला फटका बसेल व त्याचा भाजपला फायदा होईल, ही शिवसेनेला भीती होती. ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला रोखण्याकरिता शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळीच व्यूहरचना केली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने राष्ट्रवादीला बरोबर घेतले.