पंतप्रधानांच्या हस्ते आज गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन

राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने आयोजित केलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनासाठी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपात सुरू असलेली सुंदोपसुदी मोदींच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा उफाळून आली असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजन सोहळ्याबरोबरच मॅग्नेटिक महाराष्ट्रकडेही शिवसेना पाठ फिरवणार आहे.

उद्योग विभागाने वांद्रे- कुर्ला संकुलात आयोजित केलेल्या या पहिल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून २० फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत ४५०० सामंजस्य करार होणार आहेत. त्यातून राज्यात १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची आणि त्यातून किमान ३५ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

या परिषदेत रत्नागिरी रिफायनरी, रिलायन्स जिओ, रेल्वेचा लातूरचा डब्बे निर्मिती कारखाना, हौसिंग कार्पोरेशन, अमेझॉन, ब्रिटानिया, जीनस पेपर, महिंद्रा इलेक्ट्रिकल कंपन्यांशी सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे. मात्र शिवसेनेच्या विरोधानंतर कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाचा सामंजस्य करार रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उद्योग मंत्रालय शिवसेनेकडे असल्याने मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या उद्घाटन सोहळ्यास व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही स्थान मिळावे असा शिवसेनेचा आग्रह होता. मात्र सरकारी कार्यक्रम असल्याने आणि पंतप्रधानांच्या राजशिष्टाचारात पक्षप्रमुख बसत नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने मोदींच्या सर्वच कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजन सोहळ्यास स्थानिक नेत्यांना डावलण्याचे राजकारण भाजप करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने या कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केला असून पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविण्याचाही इशारा दिला आहे. तर मुंबईतील कार्यक्रमाकडे खुद्द उद्धव ठाकरेच फिरकणार नसल्याने केवळ उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा अपवादवगळता शिवसेना या  कार्यक्रमाकडे पाठ फिरविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून विविध चर्चासत्रांना सुरुवात होणार आहे. तर २० फेब्रुवारी रोजी जलसंधारण, महिला उद्योगधोरण, इज ऑफ डुईंग बिजनेस, मुंबई फायनान्शियल हब, मेक इन महाराष्ट्र यांचा समावेश आहे.  हे प्रदर्शन २३ पर्यंत खुले राहणार आहे.