पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. शारदा चिट फंड घोटाळ्यातील आरोपींना सोडू नये, हे सांगताना मोदी यांनी कोलकात्यातील दंगल आणि सर्व घटनाक्रमाकडे पंतप्रधान म्हणून पाहावे, असा सल्लाही दिला आहे. मोदी हे आधी पंतप्रधान नंतर भाजपाचे नेते आहेत. देशात अशांतता व भयाचे वातावरण निर्माण होणे लोकशाहीला मारक आहे. पश्चिम बंगालच्या भूमीवर जे राजकीय युद्ध पेटले आहे ती नव्या अराजकतेची ठिणगी असल्याचे म्हटले आहे.

प. बंगालमधील नाट्य धक्कादायक असून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा हा सामना नसून ममता विरुद्ध मोदी, भाजपा विरुद्ध तृणमूल काँग्रेसची लढाई असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने मोदी सरकारवर टीकास्त्रही सोडले.

काय म्हटलंय शिवसेनेने…
* शारदा चिट फंड घोटाळय़ात सीबीआयला आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करायची होती. पण देशातील प्रमुख, सर्वोच्च तपास यंत्रणेचे अधिकारी कोलकाता आयुक्ताच्या घरी पोहोचले ते इतक्या गडबडीत की त्यांच्याकडे तपासासंदर्भात कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती. त्यांच्याकडे समन्स नसल्याने सीबीआय पथक बेकायदा घुसले असा ठपका ठेवून कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या पथकालाच अटक केली.

* मुख्यमंत्री ममता यांनी संपूर्ण प. बंगालात व नंतर देशभरात जो हंगामा केला त्यातून देशातील सद्यस्थितीचे दर्शन घडत आहे. न्यायालये, रिझर्व्ह बँक, नीती आयोग व सीबीआयसारख्या संस्थांनी गेल्या काही वर्षांत आपली प्रतिष्ठा गमावली आहे. दिल्लीत ज्यांची सत्ता त्यांच्या मनगटावर बसलेले पोपट अशी या संस्थांची अवस्था झाली.

* 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे गणित नव्या झगडय़ामागे आहे. 2014 प्रमाणे भाजपाला यश मिळत नाही. किमान शंभर जागा उत्तरेपासून महाराष्ट्रापर्यंत कमी पडतील. त्या शंभर नव्या जागांची भरपाई करण्यासाठी भाजप सरकार प. बंगालसारख्या राज्यांकडे आशेने पाहत आहे. यासाठी कोणत्याही थराला जावे असा हा सगळा डाव आहे.

* प. बंगालात ‘रथयात्रे’चे राजकारण झाले. तेथे संघर्षाची ठिणगी पडली. ममता बॅनर्जी दुर्गामातेच्या विरोधात आहेत, त्यामुळे बंगालातील हिंदूंनी भाजपास मतदान करावे ही भाजपची भूमिका ठीक आहे, पण अयोध्या रथयात्रा काढून शेकडो करसेवकांचे बळी घेऊनही अयोध्येत राममंदिर का उभे राहिले नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.

* ममतांशी आमचे राजकीय मतभेद आहेत व राहतील, पण शेवटी या बंगालच्या वाघिणीने सगळय़ांनाच दे माय धरणी ठाय करून सोडले आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ममता यांनी रोखले व देशात गरम हवा निर्माण केली.

* केंद्राच्या ‘अरे’ला ममता ‘का रे’ने प्रत्युत्तर देत आहेत. पुन्हा सीबीआयला चौकशीसाठी जायचेच होते तर मग सोबत ‘समन्स’ का नेले नाही? कोलकाता येथे अमित शहा यांनी ममतांना आव्हान देणारी सभा घेतली. पाठोपाठ पंतप्रधान मोदी यांनी चेंगराचेंगरीत माणसे मरतील इतकी प्रचंड सभा घेऊन ममतांवर तोफा डागल्या. लगेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ममता यांना आव्हान द्यायला कोलकात्यात गेले, पण त्यांचे हेलिकॉप्टर उतरू दिले गेले नाही. उत्तर प्रदेशातील सर्व प्रश्न संपले व आता योगींना प. बंगाल सांभाळायचे आहे काय? मोदी यांनी कोलकात्यातील दंगल आणि सर्व घटनाक्रमाकडे पंतप्रधान म्हणून पाहावे. ते आधी पंतप्रधान, नंतर भाजपचे नेते आहेत.