‘पूर्व मुक्त मार्गा’ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी मनसेने केली तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करत राष्ट्रवादीने मनसेवर डॉ. आंबेडकरांच्या नावाला विरोध करत असल्याचा थेट आरोप केला. राष्ट्रवादी व मनसेमध्ये नामकरणावरून ही साठमारी सुरू झाली असली तरी मनसेने बाळासाहेबांचे नाव सुचविल्यामुळे सेनेमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चेंबूर ते भायखळ्यापर्यंतच्या रस्त्याला डॉ. आंबेडकरांचे नाव असताना पूर्व मुक्त मार्गाला त्यांचे नाव देण्याची गरज नसल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनीच व्यक्त केले आहे. मात्र रिपाईप्रमाणेच राष्ट्रवादीनेही डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी केली ती दलित मतांवर डोळा ठेवूनच, असा आक्षेप मनसेकडून घेण्यात येत आहे. मुंबईच्या जडणघडणीत शिवसेनाप्रमुखांचे असलेले योगदान तसेच त्यांच्या संकल्पनेतून मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आणि ५४ उड्डाण पूल तयार झाल्यामुळे पूर्व मुक्त मार्गाला बाळासाहेबांचे नाव देणे संयुक्तिक ठरेल, असे मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांचे म्हणणे आहे.
बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्कवर त्यांचे स्मारक उभारण्यापासून रेसकोर्सचे आंतरराष्ट्रीय उद्यान करून त्याला बाळासाहेबांचे नाव देण्याचे प्रयत्न सेनेकडून करण्यात येत आहेत. या पाश्र्वभूमीवर पूर्व मुक्त मार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी करून मनसेने बाजी मारल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
साहजिकच त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. वानखेडेवरील प्रेस गॅलरीला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी पूर्ण करून घेतली तोच प्रयोग पूर्व मुक्त मार्गाबाबत केला असता तर मनसेला कुरघोडी करण्याची संधी मिळाली नसती, असे सेनेच्याच वर्तुळात बोलले जात आहे.
नामकरणावरून आरपीआयमध्येच गोंधळ
मुंबई : शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध न करणाऱ्या, रेसकोर्सवर मनोरंजन उद्यान उभारून त्याला बाळासाहेबांचे नाव देण्याबाबत सर्वसंमतीने निर्णय करावा, अशी भूमिका घेणाऱ्या रिपब्लिकन पक्षाने पूर्व मुक्त मार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्यास विरोध केल्याने पक्षातच गोंधळाची स्थिती आहे. मनसेला विरोध करताना बाळासाहेबांच्या नावाला विरोध होत असल्याने त्याबद्दल शिवसेनेची नाराजी ओढावून घेण्याचा हा प्रकार असल्याचे पक्षातील काही कार्यकर्ते बोलत आहेत. मनसे व आरपीआयचा वाद जुनाच आहे. परंतु मधल्या काळात मनसेला महायुतीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने रामदास आठवले यांनी मग राज ठाकरे यांच्या स्वागताचीच तयारी केली. मात्र त्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून कडक टीका झाल्यानंतर आठवले यांनी पुन्हा कोलांटउडी मारली. आता पूर्व मुक्त मार्गाच्या नामांतरावरून मनसेविरुद्ध आरपीआय आसा वाद सुरू झाला आहे.