शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, असंघटित क्षेत्रातील कामगारांची ससेहोलपट, वस्तू व सेवा कराचा फटका असे अनेक विषय घेऊन आगामी काळात शिवसेना भाजपविरोधात आक्रमक होत वेगवेगळी आंदोलने चालविणार असून रस्त्यावर उतरण्यापासून समाजमाध्यामाचा यात प्रभावीपणे वापर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली असून संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दाही आगामी काळात शिवसेना लावून धरणार आहे. निवडणुकींच्या तोंडावर मोठमोठी आश्वासने देणाऱ्या भाजपने या आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी नव्याने भूलथापा देण्याचे काम चालविले असल्याकडेही शिवसेना आपल्या आंदोलनांच्या माध्यमातून दाखवून देणार आहे. यासाठी दिवाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. ‘लोकांना काय दिले’ असा सवाल करत शिवसेनेकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी मिळालीच पाहिजे आणि ती मिळाली नाही तर शिवसेना शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरेल असे शिवसेनेचे आमदार व विधान परिषदेतील गटनेते अनिल परब यांनी सांगितले. कर्जमाफीची घोषणा होऊन बरेच दिवस झाले. मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला ‘संपूर्ण कर्जमाफी’ अशी घोषणा केली होती. ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीच जाहीर केले होते. त्यामुळे आता ‘माझा शब्द’ अशी जाहिरात करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे जागून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, असे अनिल परब यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीत तसेच महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ होताना दिसते. बेरोजगारांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्तेतून बाहेर पडायला हवे – आढळराव

पिंपरी: भाजपबरोबर  राहिल्याने शिवसेनेचे नुकसान होत असल्याचे सांगत शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडायला हवे, असे स्पष्ट मत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शुकवारी िपपरीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. शिरूर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या िपपरी पालिकेच्या हद्दीतील विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आढळरावांनी शुक्रवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. बैठकीनंतर  पत्रकारांशी संवाद साधताना आढळराव म्हणाले, की शिवसेना सध्या सत्तेत असून नसल्यासारखी आहे. सत्तेत असलो किंवा नसलो फरक नाही. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडले पाहिजे, असे आपले वैयक्तिक मत आहे.