दिल्ली विधानसभा निवडणुकीत सपशेल ‘आप’टी खाल्लेल्या भाजपवर शिवसेनेने टीकास्त्र सोडल्यानंतर भाजपनेही जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-सेनेतील धुसफुस उघड झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील पराभवानंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये बोलताना टोला हाणला. तर महसूलमंत्री एकनाथ खडसे काम करू देत नसल्याची तक्रार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर शरसंधान केले. आपच्या विजयानंतर फुटू लागलेल्या या ‘आप’टीबारांमुळे  राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

भाजपच्या मंत्र्यांवर सेनेचे मंत्री नाराज
अधिकारच नसतील, तर मंत्रिपदे हवीतच कशाला, असा रोकडा सवाल करत शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी थेट महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरच शरसंधान साधले आहे. कामच करू दिले जात नसल्यास मंत्रिपदच नको, अशी भूमिका राठोड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे.
अधिकार नसल्याने गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकरही गेल्या आठवडय़ापासून नाराज आहेत. अधिवेशनात उत्तरे द्यायची, तर राज्यमंत्र्यांना खात्यातील विषयांची सखोल माहिती असणे अपेक्षित आहे, पण त्यांना ती मिळत नसल्याची वायकर यांची तक्रार आहे. ती तक्रार योग्य असून त्यांना अधिकार असले पाहिजेत, असे मत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
अधिकारांचे वाटप कॅबिनेट मंत्रीच करतात, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शिवसेनेला झटकून टाकले आहे.

खरा मित्र अडचणीतही साथ देतो!
 मुख्यमंत्र्यांचा टोला
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे शिवसेनेसह अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. परंतु, दुसऱ्याच्या घरात मूल जन्माला आले तर, त्याचा आनंद किती दिवस साजरा करणार, असा खोचक प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाशिक येथे बोलताना थेट शरसंधान केले. भाजप-शिवसेना हे मित्रपक्ष आहेत. खरा मित्र हा आनंदाच्या क्षणांबरोबर अडचणीच्या काळातही साथ देतो याची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला मित्रधर्म पाळण्याचा सल्ला दिला.

तेव्हा कुठे गेला होता मैत्रीधर्म?
शिवसेनेचा सवाल
विधानसभा निवडणुकीनंतर अधिक जागा मिळविल्याच्या आनंदात शिवसेनेला अपमानास्पद वागणूक दिली गेली, तेव्हा भाजपचा मैत्रीधर्म कुठे गेला होता, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जेव्हा सर्व जण भाजपची साथ सोडून जात होते, तेव्हा शिवसेना गेली २५ वर्षे भाजप आणि मोदी यांच्या पाठीशी राहिली आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ठाकरे व सामनातील टीकेबाबत भाजपने शिवसेनेकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरे यांचे मोदींवरील टीकास्त्र आणि ‘सामना’तील लिखाणाबाबत भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जावडेकरांवर कदम यांची टीका  
केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत बोलाविले जात नसल्याबद्दल राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा चेंडू केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या कोर्टातच ढकलला असून बैठकीला कोणाला बोलवायचे, हे तेच ठरवितात, असे स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेच्या मंत्र्यांना डावलले जाते किंवा योग्य वागणूक दिली जात नाही, काम करू दिले जात नाही, याचा अनुभव येत आहे. पर्यावरणमंत्री कदम यांनाही हे अनुभव आले आहेत. जावडेकर यांनी गेल्या काही दिवसांत मुंबईत येऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर बैठका घेतल्या. मुंबई व राज्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णयही त्यात घेण्यात आले. पण पर्यावरण खात्याचे कॅबिनेटमंत्री असूनही कदम यांना बोलाविण्यात आले नाही. याबद्दल कदम यांनी नाराजी व्यक्त केली.