News Flash

शोभायात्रेत शिवसेना-भाजपमध्ये ठिणगी

कार्यकर्त्यांचे गिरगावातील यात्रेतच ठिय्या आंदोलन

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे गिरगावातील यात्रेतच ठिय्या आंदोलन

दक्षिण मुंबईमधील गिरगाव परिसरातून एकाच मार्गावर गुढीपाडव्याचे औचित्य साधून काढण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या नववर्षांच्या स्वागतयात्रांवरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वाद उफाळून आला आहे. शिवसेनेच्या नववर्ष स्वागतयात्रेने अडवणूक करून त्यामागून मार्गस्थ होणाऱ्या यात्रेला तिष्ठत ठेवल्याने  स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे पदाधिकारी संतप्त झाले आणि त्यांनी यात्रा सुरू असताना मध्येच ठिय्या आंदोलन केले. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गिरगावात धाव घेतली आणि स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या यात्रेला मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे एक संघर्ष टळला.

गेली अनेक वर्षे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे गिरगावमधील फडके गणेश मंदिर येथून गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. ही यात्रा प्रार्थना समाज, जगन्नाथ शंकरशेट मार्गावरून मार्गस्थ होऊन तिचा धोबीतलाव येथे समारोप होतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या मंडळींचा स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे ही यात्रा भाजपप्रणित असल्याचा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा दावा आहे. शिवसेना दक्षिण मुंबईतर्फे २०१५ पासून जगन्नाथ शंकरशेट मार्गावरुन धोबीतलावपर्यंत नववर्ष स्वागत यात्रा सुरू करण्यात आली. सुरुवातीपासूनच या दोघांमध्ये धुसपूस सुरू आहे. एका मार्गावरून एका संस्थेची स्वागत यात्रा जात असतानाही पोलिसांनी शिवसेनेच्या स्वागत यात्रेस हरकत घेतली नाही. त्यामुळे पहिल्याच वर्षी उभयतांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

रविवारी दोन्ही यात्रा नियोजित वेळेत निघाल्या. रविवार असल्यामुळे सुट्टीची संधी साधून गिरगावातील अनेक जण यात्रांमध्ये सहभागी झाले होते. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानची यात्रा ९.३० च्या सुमारास गिरगाव चौकामध्ये पोहोचली. तेव्हा शिवसेनेची यात्रा तेथून जात होती. शिवसेनेच्या यात्रेत सहभागी झालेले शिवनाद ध्वजपथकाचे सादरीकरण गिरगाव चौकात सुरू होते. सादरीकरण संपल्यानंतर आपली यात्रा पुढे नेण्याचा विचार स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे पदाधिकारी करीत होते.

मात्र पथकाचे सादरीकरण बराच वेळ सुरू होते. तिष्ठत उभ्या असलेल्या यात्रेला मार्ग मोकळा करून द्यावा, अशी विनंती प्रतिष्ठानचे पदाधिकारी वारंवार पोलिसांना करीत होते. मात्र पोलिसांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. उन्हाचा वाढता तडाखा आणि यात्रेत सहभागी झालेल्यांची गर्दी यामुळे यात्रेत सहभागी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शिवसेनेच्या यात्रेला गती देण्याबाबत पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याने अखेर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गिरगावातील निकदवरी लेनच्या नाक्याजवळ रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

जलकुंभाच्या श्रेयासाठी भाजप – सेना नगरसेवकात वाद

भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने मिरा रोड येथे बांधलेल्या जलकुंभाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नगरसेवक उद्घाटन समारंभात हमरीतुमरीवर उतरले. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. मात्र पोलीसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे प्रकरण निवळले. एकीकडे गुढीपाडव्यानिमित्त नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत असतानाच श्रेयवादासाठी नगरसेवकांमध्ये मात्र खालच्या पातळीवरील राजकारणाचा तमाशा रंगल्याने नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

नववर्ष स्वागतयात्रांनी मुंबापुरी दुमदुमली!

गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून ठिकठिकाणी ढोल-ताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागतयात्रांनी अवघी मुंबापुरी दुमदुमून गेली. अनेक मुंबईकर पारंपरिक वेशामध्ये नववर्ष स्वागतयात्रांमध्ये सहभागी झाले होते. सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोठय़ा संख्येने तरुणाई आणि ज्येष्ठ मंडळी रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे गिरगाव, दादरसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधीर रस्ते गर्दीने बहरुन गेले होते. पौराणिक कथा आणि सामाजिक प्रश्नांविषयी जनजागृती करणारे चित्ररथ नववर्ष स्वागतयात्रांच्या अग्रभागी दिसत होते. डोंबिवलीपाठोपाठ दक्षिण मुंबईतील एकेकाळी अस्सल मराठमोळा परिसर असलेला गिरगाव नववर्ष स्वागतयात्रेने दणाणून गेला.  स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे यंदा गिरगावात आयोजित करण्यात आलेल्या स्वागतयात्रेमध्ये राज्याच्या वनविभागाचा व्याघ्र संवर्धनाचा देखावा, धोबीवाडी उत्सव मंडळातर्फे म्हातारीचा बूट, कापरेश्वर मार्ग मंडळाचा वारीचा चित्ररथ आणि शहीद गौरव समितीचा स्वराज्यभूमी संकल्पनेवर आधारलेला चित्ररथ सहभागी झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 1:35 am

Web Title: shiv sena vs bjp fight in gudi padwa rally
Next Stories
1 फेरीवाल्यांकडून कुटुंबातील तिघांची हत्या
2 ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मधून जन्मदात्याचे नाव लावता येणार नाही
3 छुप्या कराला ग्राहक पंचायतीचा पाठिंबा
Just Now!
X