स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेने परस्पर तीन उमेदवार जाहीर करून टाकल्यानंतर उरलेल्या तीन जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेत भाजपने विदर्भातील दोन व मराठवाडय़ातील उस्मानाबाद—लातूर—बीड मतदारसंघातून उमेदवार निश्चित केले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजप—शिवसेना यांच्यातील थेट संघर्ष टळला असून सेनेशी जागावाटपाची चर्चा टाळूनही भाजपने युती कायम राखल्याचे चित्र समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड—रत्नगिरी—सिंधुदुर्ग), जयवंत जाधव (नाशिक), बाबा जानी दुर्राणी (परभणी—हिंगोली), काँग्रेसचे दिलीप देशमुख (उस्मानाबाद—लातूर—बीड), भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती) आणि मितेश भांगडिया (वर्धा—चंद्रपूर—गडचिरोली) अशा एकूण सहा सदस्यांची मुदत मे—जूनमध्ये संपत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे. २१ मे रोजी मतदान होईल, तर २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या भाजपकडे या सहा जागांपैकी राज्यमंत्री प्रवीण पोटे, मितेश भांगडिया यांच्या रूपाने दोन जागा आहेत, तर राष्ट्रवादीच्या तीन जागा आहेत. एक जागा काँग्रेसकडे आहे.

भाजपने अमरावतीमधून अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार व राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली. तर चंद्रपूरमधून विद्यमान आमदार मितेश भांगडिया यांच्याऐवजी प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. सध्या कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या उस्मानाबाद—लातूर—बीड मतदारसंघातून बीडमधील मराठा नेते व माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. मराठवाडय़ातील सत्तासमीकरणे व बीड जिल्ह्यच्या राजकारणात महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी धस यांची उमेदवारी महत्त्वाची असल्याने त्यांची निवड झाल्याचे कळते. ही यादी दिल्लीत मंजुरीसाठी पाठविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. विधान परिषद निवडणुकीत युती होणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढणार असे जाहीर केले. इतकेच नव्हे तर भाजपच्या मनात असलेल्या नाशिकसह, कोकण व परभणी—हिंगोली या तीन जागांवर थेट उमेदवारही जाहीर करून टाकले. त्यामुळे आता भाजप काय करणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण लोकसभा—विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यास इच्छुक असलेल्या भाजपने विधान परिषद निवडणुकीत नमते घेत शिवसेनेने जाहीर केलेल्या तीन जागा वगळता उरलेल्या तीन जागांवर उमेदवार निश्चित केले. अर्थात त्यातील अमरावती आणि चंद्रपूर अशा दोन जागांवर सध्या भाजपचेच आमदार आहेत. तरीही कोकण किंवा नाशिकमध्ये थेट पक्षाचा उमेदवार देणे भाजपने टाळले. त्यामुळे शिवसेनेने युतीची चर्चा न करताही भाजपने युती राखल्याचे चित्र आहे.