राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये खणाखणी; भाजपच्या स्वबळाला शिवसेनेची मराठी बाणा दाखवण्याची तयारी; उद्धव यांच्या उपस्थितीत रणनीती
विधानसभा, कल्याण-डोंबिवली महापालिका यानंतर आता पुढील वर्षी होणारी मुंबई महापालिकेची निवडणूकही स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरू केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी व्यूहरचनाही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडूनही मुंबई महापालिकेवर भाजपने स्वबळावर सत्ता मिळवावी, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना असून शिवसेनेला तडाखा देण्यासाठी सर्व पातळ्यांवर पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्यासाठी सत्ता द्यावी, यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप स्वबळावर लढली आहे. ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवावी, अशा अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनाही आहेत. मुंबईतील सत्ता शिवसेनेकडून हिसकावून घेऊन त्यांना धडा शिकविण्याचा भाजपचा निर्धार आहे. अमित शहा यांच्या सूचनेनुसार भाजपने काही संस्थांमार्फत स्वबळावर लढल्यास किती यश मिळेल, याची सर्वेक्षणे केली. त्याचे अहवाल भाजपला अनुकूल आले असल्याने नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे, असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
रेल्वे, विमानतळ, संरक्षण, आयुर्विमा महामंडळ आदी केंद्रीय विभागांच्या जागेवरील झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसनाचे गाजर दाखविण्यात येत आहे. त्यातून झोपडपट्टय़ांमध्ये मतपेढी तयार करण्यासाठी भाजपने यंत्रणा कामाला लावली आहे. उत्तर भारतीय, बिहारी यांचे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.
महापालिकेचे बांधकाम परवाने प्रक्रिया सुसूत्रीकरण, परवान्यांची संख्या कमी करणे, याविषयीच्या पुस्तिकेचे प्रकाशन व घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्य़ाद्री अतिथीगृहात केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत शिवसेनेला श्रेय मिळू न देता हा कार्यक्रम महापौरांना आमंत्रित करून करण्यात आला. मुंबईच्या विकास आराखडय़ातील चुका दुरुस्त करून सर्वसामान्यांना दिलासा देणे, दहीहंडी, गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक मंडळांच्या अडचणी दूर करणे, याचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस व भाजपला मिळेल, हे पाहिले गेले.
भाजपमध्ये अंतर्गत निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून तालुका व जिल्हाध्यक्षही शिवसेनेला तोंड देता येईल अशा पद्धतीने तयारी करण्यास सक्षम असे निवडण्याच्या सूचना आहेत. ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हरले, त्यांची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांवर असून धारावीची जबाबदारी शेलार यांनी घेतली आहे. आशीष शेलार हे शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याने त्यांच्यावरच पुन्हा मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. शिवसेनेच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे भाजप श्रेष्ठी वैतागले असून मुंबई महापालिका या शिवसेनेच्या मुळावरच घाव घालण्याची व्यूहरचना करण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत चर्चासत्र
शिवसेनेची मुंबईत सत्ता असतानाही मुंबईला बकाल स्वरूप मिळाले आणि योग्य विकास झाला नाही. केंद्रात व राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारने विकासाच्या मार्गावर वाटचाल केली असून मुंबईतही भाजपला सत्ता दिली, तरच मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होईल, हे मुंबईकरांवर बिंबविले जाणार आहे. त्यादृष्टीने पंतप्रधानांच्या उपस्थितीत पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात मुंबईविषयक स्वतंत्र चर्चासत्र आहे.
श्रेयाचे राजकारण
मेट्रो, मोनो रेल, शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू, किनारपट्टी रस्ता (कोस्टल रोड) यांचे श्रेय भाजपला मिळेल, अशा पद्धतीने पावले टाकून प्रचार करण्यात येणार आहे. बीडीडी चाळींचा विकास, धारावीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे, याचे श्रेय भाजपकडून घेतले जात आहे. मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारचा निर्णय झाल्यावर लगेच धारावीत जाहीर सभा आयोजित केली.