शिवसैनिक संतप्त – उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष्य

मतांचे विभाजन करुन भाजपला गुजरातमध्ये धक्का देण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्याच वेळी महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुजरातमधील चौरयासी विधानसभा मतदारसंघामधील भाजप उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून नवे वादळ निर्माण केले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. विजय शिवतारे यांच्याबाबतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेर कोणती भूमिका घेतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी टीपेला पोहोचली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उडी घेऊन भाजपसमोर नवे आव्हान निर्माण केले आहे. शिवसेनेने प्रचारसभा, प्रचारयात्रांचा सपाटा लावला असतानाच महाराष्ट्रातील पुरंदर येथून शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झालेले आणि  सध्या जलसंपदा राज्यमंत्रीपद भूषवित असलेले विजय शिवथरे सूरतमधील चौरयासी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवित असलेल्या जंखनाबेन पटेल यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित होते. जंखनाबेन पटेल या माजी आमदार आणि भाजपचे नेते राजा पटेल यांच्या कन्या आहेत. राजा पटेल आणि विजय शिवतारे यांची मैत्री सर्वश्रूत आहे. या मैत्रीमुळे विजय शिवथरे जंगनाबेन पटेल यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास गेले होते. त्यावेळी विजय शिवथरे यांच्या सोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलारही होते.

चौरयासी विधानसभा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो. राजा पटेल यांचे २०१५ मध्ये निधन झाल्यानंतर चौरयासी विधानसभा मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक जंखनाबेन पटेल यांनी लढविली होती. पोटनिवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या.

गुजरातमधील राजकोट, सूरत परिसरातील सुमारे ४७ विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांच्या मदतीसाठी मुंबईतील शिवसेनेचे पदाधिकारी गुजरातला रवाना झाले आहेत. शिवसेनेने निवडणुकीच्या रणात उडी घेतलेली असताना शिवसेनेच्या कोटय़ातून महाराष्ट्रात राज्यमंत्रीपद भूषविणारे विजय शिवथरे भाजप उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहिल्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यातच विजय शिवथरे हे आशीष शेलार यांच्यासोबत या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यामुळे आगीत तेल पडले आहे. विजय शिवतारे यांच्यावर उद्धव ठाकरे कोणती कारवाई करणार याकडे गुजरात दौऱ्यावर गेलेले शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याबाबत विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

विजय शिवथरे एका विवाह सोहळ्यासाठी चौरयासीमध्ये गेले होते. तेथे भेटलेले भाजप नेते विजय शिवथरे यांना जंगनाबेन पटेल यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास घेऊन गेले. शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा भाजप नेत्यांचा हा कट आहे. गेले दोन दिवस विजय शिवथरे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत.   – राजूल पटेल, गुजरात निवडणूक संपर्कप्रमुख