विकास आराखडय़ाची माहिती ‘अ‍ॅप’वर उपलब्ध करण्यावरून राजकारणी आणि प्रशासनात मानापमान नाटय़

मुंबईच्या विकास आराखडय़ाची माहिती मोबाइलवर उपलब्ध करणाऱ्या अ‍ॅपचे महापौरांच्या गैरहजेरीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलेल्या लोकार्पणाबद्दल पालिका सभागृहात शुक्रवारी राजकारणी आणि प्रशासनात मानापमान नाटय़ रंगले. महापौर आणि पालिका सभागृहाला अंधारात ठेवून अ‍ॅपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केल्याबद्दल भाजप वगळता सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना शुक्रवारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. याबद्दल आयुक्तांनी महापौर आणि सभागृहाची माफी मागावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आणि या मागणीला पाठिंबा देत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला. माझ्या हातून असा प्रमाद घडलेला नाही, असे आयुक्तांनी वारंवार स्पष्ट केले. दस्तुरखुद्द महापौर आणि सभागृह नेत्यांनी कच खाल्ली आणि असा प्रकार कधीही घडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना करीत शिवसेनेने या वादावर पडदा टाकला.

मुंबईचा २०१४-३४ या २० वर्षांचा विकास नियोजन आराखडा मोबाइलवर पाहता यावा यासाठी पालिकेने ‘अ‍ॅप’ तयार केले. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ डिसेंबर रोजी या ‘अ‍ॅप’चे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाची पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला गंधवार्ताही नव्हती. या प्रकारामुळे शिवसेनेत संताप व्यक्त करण्यात येत होता. सभागृह नेते यशवंत जाधव यांनी शुक्रवारी पालिका सभागृहाच्या बैठकीत एका निवेदनाच्या माध्यमातून या संतापाला वाट मोकळी करून दिली. या कार्यक्रमाला महापौर आणि नगरसेवकांना का बोलावण्यात आले नाही. हा सभागृह आणि महापौरांचा अवमान आहे. त्याचे उत्तर आयुक्तांनी द्यावे, अशी मागणी जाधव यांनी सभागृहात केली. सभागृहात अजोय मेहता यांनी सभागृहात यावे आणि खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. आयुक्त मनमानी कारभार करीत आहेत. आता त्यांनी महापौरांचा अपमानही केला आहे. त्यामुळे शिवसेनेने आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव सादर करावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी केली. राष्ट्रवादीच्या सईदा खान, कप्तान मलिक यांच्यासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी या मागणीची री ओढली. त्यामुळे सभागृहातील नूरच बदलून गेला. सेनेवरच बूमरँग होण्याची चिन्हे निर्माण झाली. त्याच वेळी आयुक्त सभागृहात न आल्याने सेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. गोंधळ सुरू असताना माजी महापौर विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, नगरसेविका किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे आदींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेविका सभागृहाबाहेर पडल्या व थेट पालिका आयुक्तांचे दालन गाठले. आयुक्तांना घेराव घालून त्यांना सभागृहात येण्याची सूचना नगरसेविकांनी केली. या नगरसेविकांच्या पाठोपाठ मेहता सभागृहात दाखल झाले. आयुक्त येताच नगरसेवकांचा आक्रमकपणा गळून पडला व गोड शब्दांत सारवासारव सुरू झाली. त्याच वेळी राष्ट्रवादीच्या कप्तान मलिक यांनी आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव सादर करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केल्याची कल्पना मेहता यांना दिली. तसेच नगरसेवकांनी घूमजाव केल्याबद्दल कप्तान मलिन हे नाराज झाले.

मोठय़ा मनाने आम्ही माफ करतो

मुख्यमंत्र्यांबरोबर ६ डिसेंबर रोजी विकास आराखडय़ाबाबत बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना अ‍ॅपची माहिती देण्यात आली. नागरिकांना तात्काळ हे अ‍ॅप उपलब्ध करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आणि या आदेशांचे पालन करण्यात आले. सभागृह अथवा महापौरांचा कोणताही अवमान झालेला नाही आणि भविष्यातही होणार नाही, असे स्पष्टीकरण अजोय मेहता यांनी दिले. मात्र महापौरांचा अपमान झाल्याबद्दल आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी करीत सेना नगरसेवकांनी घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. आयुक्तांच्या वक्तव्यावरून त्यांना पश्चाताप झाल्याचे दिसते. भविष्यात असा प्रकार घडणार नाही अशी कबुली आयुक्तांनी दिल्याने मोठय़ा मनाने त्यांना माफ करतो, असे सांगत जाधव यांनी या वादावर पडदा टाकला.