26 February 2021

News Flash

शेतकरी संपात सेना विरुद्ध सेना!

प्रमुख नेत्यांकडून संप फोडल्याचा आरोप

शिवसेना ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

प्रमुख नेत्यांकडून संप फोडल्याचा आरोप तर मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दिला तर शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा संप फोडण्याचे काम करत असल्याचा आरोप केला असताना शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी मात्र नेमकी उलटी भूमिका घेत शेतकरी संप मिटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. शिवसेनेच्या या दोन भूमिकांमुळे शिवसैनिकांमध्येच अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून येते.

सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी संप फोडण्याचे काम केल्याची जोरदार टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सरकार आजचे मरण उद्यावर ढकलत असल्याचे राऊत यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले तर त्याच वाहिनीवर बोलताना विजय शिवतरे यांनी मात्र शेतकरी प्रतिनिधी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही नेत्याला मध्यस्थी न घेता संपावर काढलेला तोडगा हा स्वागतार्ह असून येणाऱ्या काळात सरकारकडून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. कर्जमुक्तीची मागणी शिवसेनेचीही होती असे सांगून शिवतरे म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला कर्जमाफीचा निर्णय हा शेतकरी हिताचा आहे. एक चांगली सुरुवात केल्याबद्दल मुख्यमंत्री व शेतकरी नेत्यांचे मी अभिनंदन करतो. शेतकऱ्यांचा संप मिटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे शिवसेनेने स्वागत केल्याचेही शिवतरे यांचे म्हणणे आहे. शिवतरे यांच्या विधानामुळे शिवसेना अडचणीत आली असून सरकार पळपुटेपणा करते असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे. सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी हीच शिवसेनेची मागणी असून हा संप संपलेला नाही, असेही राऊत यांनी सांगितले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकरी हे अल्पभूधारक होते हे बैठकीला उपस्थित असलेल्यांनी जाहीर करावे, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे व प्रवक्ते संजय राऊत हे शेतकरी संपाच्या बाजूने ठामपणे उभे राहात मुख्यमंत्र्यांवर शरसंधान करत असताना त्यांच्याच पक्षाचे मंत्री विजय शिवतरे हे मात्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहिल्यामुळे शिवसेनेची मोठी फसगत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 1:47 am

Web Title: shiv sena vs shiv sena in maharashtra farmer strike
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज यांचे पंतप्रधानांना पत्र!
2 अल्पभूधारकांच्या कर्जमाफीचा विदर्भ, मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना फायदा नाही!
3 अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी!
Just Now!
X