मंजुरीसाठी आज तातडीची सर्वसाधारण सभा; पालिका १६ कोटी रुपये मोजणार
अंधेरी (पश्चिम) येथील अतिक्रमण असलेला एक भूखंड ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु असून त्यासाठी शनिवारी तातडीने पालिका सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असून तसे झाले तर अतिक्रमण झालेल्या या भूखंडासाठी पालिकेला सुमारे १६ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.
कमलाकर वालावलकर मार्ग, मोगरा नाल्याजवळ असलेल्या भूखंडावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हा भूखंड दवाखान्यासाठी आरक्षित असून ते कारण पुढे करत हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरु केले आहेत. मंगळवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत शिवसेना-भाजपने या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी त्यास आक्षेपही घेतला होता.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याला मंजुरी मिळावी म्हणून शनिवारी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्वसाधारण या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर यांनी घेतला आहे.
दहिसर येथील एका मैदानाच्या विस्तारासाठीची जागा ताब्यात घेण्याचा प्रस्तावही तातडीचे कामकाज म्हणून या सर्वसाधारण सभेत आणला जाणार
आहे.